पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार.

PCC NEWS

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार.

पुणे, दि.२५ : राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात; आगामी काळातही पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल इलेव्हन २३ येथे आयोजित ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी आमदार विलास लांडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे, संघटक संजय भोकरे, पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन शिंदे, पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचे सदस्य बबन पवार आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आदरपूर्वक सन्मान करण्यासाठी, त्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात येत आहे. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत करण्यात येते. या निधीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५० कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता आधीचे ५० कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील ५० कोटी असे १०० कोटी रुपये झाले आहेत. पत्रकारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून मराठी पत्रकारितेचा पाया रचला आहे. मराठी पत्रकारितेला निर्भीडता, नि:पक्षपातीपणा आणि लोकाभिमुखतेचा वारसा मिळालेला आहे. राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेले निर्णय, ध्येयधोरणे, उपक्रम नागरिकापर्यंत पोहचविण्याचे काम अतिशय चांगल्याप्रकारे माध्यमांनी केले आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत करण्यात आलेली कामे तळागळापर्यंत पोहचविण्याचे माध्यमांनी अतिशय चांगले काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाच्यावतीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला.

सुरुवातीला लोकशिक्षण, ज्ञानप्रसार आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरीता पत्रकारिता करण्यात येत होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटीशकालीन चुकीच्या धोरणाविरुद्ध विरोध करण्याचे काम मराठी माध्यमांनी नेटाने केले. मराठी वृत्तपत्रातून समाज घडविण्याचे काम करण्यात आले. त्या काळातील ध्येयनिष्ठ पत्रकारांनी वृत्तपत्र समाज प्रबोधनासाठी, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी, जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम असल्याचे दाखवून दिले. आज काळात या गोष्टीचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज आहे.

समाज माध्यमाच्या युगात नागरिकांना जलद बातम्या मिळण्याकरीता पत्रकार काम करीत असतात. चुकीच्या गोष्टीवर टिकाटिप्पणी करणे माध्यमांचा हक्क आहे.पत्रकारांनी चांगल्या गोष्टी समाजापुढे आणण्यासाठी आणि वाईट गोष्टीला रोखण्यासाठी काम करावे. घडलेल्या घटनेचे वार्तांकन करण्यासोबत सामाजिक स्वास्थ जपण्यासाठी वस्तुस्थितीदर्शक बातमी दाखविण्याचे काम माध्यमांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीना समाजापुढे आणण्याचे काम केले आहे. देशाच्या, समाजाच्या प्रगतीत आणि उन्नतीत त्यांचे योगदान आहे. यातून इतरांनीही प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात काम करत अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, बदलत्या युगात प्रवाहाच्याविरुद्ध निर्भीडपणे आणि विवेकबुद्धीला जागृत ठेवून सामाजिक वास्तव्य समाजासमोर आणणे हे खऱ्या पत्रकारितेचे काम आहे. वंचित, दुर्बल अशा घटकांचा आवाज होण्याचे कामही पत्रकारितेने केले आहे. समाजात महिलांवर होणाऱ्या घटना आणि अत्याचार माध्यमांनी समोर आणावे, घडलेल्या घटनेबाबत सतत पाठपुरावा करुन संबंधित पीडिताला न्याय देण्याची भूमिका ठेवावी, असेही श्रीमती चाकणकर म्हणाल्या.

श्री. मुंडे म्हणाले पिंपरी-चिंचवड या औद्योगिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक नगरीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करुन त्यांची यशोगाथा कॉफ़ीटेबल पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यात आली आहे.

प्रास्ताविकात श्री. भोकरे म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक जाणिव ठेवून पत्रकाराने नेहमी प्रयत्नवादी राहून काम करावे. या माध्यमातून आदर्श पत्रकारितेच्या व्रताचे पालन करावे.

यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांना ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment