को’वॉर’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन. 

PCC NEWS

को’वॉर’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन.

पिंपरी, ता. १२ – संग्राह्य मूल्य असणारे ‘को’वॉर’ हे पुस्तक कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी आत्मविश्वास देणारे, लढण्यासाठी बळ देणारे पुस्तक म्हणून उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आणि ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांच्या ‘को’वॉर लढा जीवन मरणाचा या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. ११) श्री. पवार यांच्या हस्ते पुणे विधान भवनात करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, लेखक अण्णा बोदडे, राजन वडके, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, राहुल भोसले, शाम लांडे, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

“पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संकटाचा सामना करताना सामूहिक जबाबादारीने केलेल्या कार्याची माहिती ‘को’वॉर पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा बोदडे आणि वडके यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या काळात आपला जीव धोक्यात घालून लढलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान या पुस्तकामुळे होणार आहे,” असे पवार यांनी सांगितले.

“कोरोना संकटकाळातील पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर ओढवलेल्या परिस्थितीचा आणि त्या काळात महापालिका, वैद्यकीय, पोलिस आदी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व सामाजिक संघटनांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे. कोरोना बाधितांचे जीव वाचविण्यासाठी अक्षरशः प्राणांची बाजी लावत उपचार करणारे डॉक्टर, सिस्टर, नर्स, वॉर्डबॉय, मावशा या `कोरोना वॉरियर्स`नी केलेल्या सेवेचं अभूतपूर्व दर्शन घडले. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कामगार, भाजी-फळ बाजार, किराणा व्यवसाय, शैक्षणिक, चित्रपट, नाट्य, सांस्कृतिक, क्रीडा, प्रसिद्धी माध्यम आदी सर्वच क्षेत्रांना या भयावह महामारीचा फटका बसला. या आव्हानात्मक परिस्थितीतून पिंपरी-चिंचवड शहराला सावरण्यासाठी महानगरपालिका, पोलिस दल तसेच सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या. कोरोना वाधितांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि गरीब, गरजूंच्या पोटाची भूक भागविण्यासाठी शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था-संघटना आपसांतील सर्व भेद विसरून कार्यरत झाल्या होत्या. शहरावर आक्रमण केलेल्या या महामारीच्या विरोधात सर्व जण एकजुटीने आणि एकदिलाने लढत होते. एकीकडे कोरोनाची लागण झाल्यानं कुटुंबच्या कुटुंब जग सोडून जात होती. तर दुसरीकडं या ही परिस्थितीत लोक एकमेकांना धीर आणि आधार देत होते. हृदय पिळवटून टाकणारी अशी ही दृष्ये होती. पिंपरी-चिंचवड मधील ही परिस्थिती आम्ही अनुभवत होतो. शहरावर ओढवलेल्या या संकटाचा आणि परिस्थितीचा विचार करता, ती देशाचे प्रातिनिधिक दर्शन घडवित होती. कोरोना काळातील सामाजिक वास्तव नजरेत, मनांत साठवत होतो. कोरोनाच्या संकटावर मात करत जगण्यासाठी लोकांच्या जीवन-मरणाच्या या लढ्याची कायमस्वरुपी नोंद झाली पाहिजे, या विचारातून `को-वॉर` लढा जीवन मरणाचा या पुस्तकाचा जन्म झाला,” असे मनोगत बोदडे आणि वडके यांनी व्यक्त केले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment