महापालिका सीएसआर अंतर्गत भोसरी येथे उभारणार अत्याधुनिक शिवण कक्ष.

PCC NEWS

महापालिका सीएसआर अंतर्गत भोसरी येथे उभारणार अत्याधुनिक शिवण कक्ष.

पिंपरी २० जुलै २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका बी.एम.सी सॉफ्टवेअर कंपनीच्या मदतीने सीएसआर अंतर्गत अत्याधुनिक सुविधा असलेले ‘शिवण कक्ष’ भोसरी येथे उभारणार आहे. महिलांमध्ये कौशल्य विकसित करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सी.एस.आर विभाग व बी.एम.सी सॉफ्टवेअर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा सी.एस.आर विभाग प्रमुख निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट,सी.एस.आर सल्लागार श्रुतिका मुंगी उपस्थित होते. तसेच बी.एम.सी सॉफ्टवेअर कंपनीचे क्षेत्र उपाध्यक्ष आणि संचालक विकास छाब्रा, सी.एस.आर मुख्य चौला दिवानजी व वरिष्ठ वित्त व्यवस्थापक गिरीश क्यादिगुप्पी उपस्थित होते. त्याच बरोबर थिंकशार्प फाउंडेशनचे संचालक व व्यवस्थापक संतोष फड उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत नव्याने उभारण्यात येणारे शिवण कक्षामुळे मदत होणार असून त्याबाबतचा सामंजस्य करा बी.एम.सी सॉफ्टवेअर व थिंकशार्प फाउंडेशन यांच्यासोबत करण्यात आला.

पिंपरी चिंचवड विभागातील ज्या घरी शिवणयंत्रांची सुविधा नाही पण शिवणकलेचा उपयोग करून ज्या महिला स्वयम रोजगार प्राप्त करू इच्छितात अशा महिलांना या उपक्रमाचा निश्चितच लाभ घेता येईल.

शिवण कक्षाची वैशिष्ट्ये –

या उपक्रमामुळे महिला समर्थपणे ऑर्डर हाताळणी करू शकतील तसेच अत्याधुनिक मशीनचा वापर करून आणि आपले काम कार्यक्षमतेने पूर्ण करू शकतील. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्थितीत आणि जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. भोसरी येथे उभारण्यात येणाऱ्या शिवण कक्षामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामध्ये इंडस्ट्रियल मशिन्स, एम्ब्रॉयडरी मशिन्स, मोटराइज्ड मशीन, स्वयंचलित शिवण मशीन, कापड कापण्याचे अत्याधुनिक मशीन, स्टोरेज, टेबल, इस्त्री, शिवणास लागणारे साहित्य आणि शिवण कक्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी समन्वयक देखील असणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील महिलांचा कौशल्य व आर्थिक विकास होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या वाटचालीसाठी सी.एस.आर कंपन्यांचे योगदान देखील वाखाणण्याजोगे आहे. सी. एस . आर अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा फायदा समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोचत असल्याने नागरिकांचा सर्वांगीण विकास होण्यास मोलाची मदत मिळत आहे.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे -पाटील.

TAGGED:
Share This Article
Leave a comment