छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समर्पकपणे समाविष्ट करावा
शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे बालभारतीकडे निवेदन
प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड : छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, विद्वत्ता, प्रशासन, साहित्यनिर्मिती, स्वराज्यरक्षण आणि बलिदान यांची विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या जीवनकार्याचा शालेय अभ्यासक्रमात समर्पकपणे समावेश करावा, अशी मागणी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्याकडे प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले. इयत्ता पाचवी किंवा त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर स्वतंत्र पाठ्यपुस्तक प्रकाशित करावे, तसेच ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे त्यांच्या कार्याचा अभ्यासक्रमात योग्य समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
विद्यार्थ्यांना हा विषय अधिक सुलभ आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने समजावा यासाठी पाठ्यपुस्तकात छायाचित्रे, ऐतिहासिक संदर्भ, कालरेषा (Timeline) तसेच पूरक माहितीचा समावेश करावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीच्या अनुषंगाने शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांची शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर स्वतंत्र शालेय पाठ्यपुस्तकाची आवश्यकता तसेच शालेय अभ्यासक्रमातील त्यांच्या इतिहासाच्या समर्पक समावेशाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्य आणि बलिदान पुढील पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समर्पक समावेश व्हावा, यासाठी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.”
प्रदेश कार्याध्यक्ष अथर्व सुनील तावरे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबरोबरच त्यांची विद्वत्ता, प्रशासन आणि स्वराज्यरक्षणातील योगदान विद्यार्थ्यांना अभ्यासता यावे, यासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तकाची आवश्यकता आहे. या मागणीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू.”
महाराष्ट्राच्या इतिहासाची विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण व सर्वांगीण ओळख व्हावी, या उद्देशाने ही शैक्षणिक मागणी करण्यात आली असून, संबंधित विभागाने याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
