पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाची नवीन इमारत उभारणार, बांधकामासाठी १९३ कोटींच्या निधीस मंजुरी.

PCC NEWS

पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाची नवीन इमारत उभारणार, बांधकामासाठी १९३ कोटींच्या निधीस मंजुरी.

पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाची नवीन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे.

पुणे – पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाची नवीन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून १९३ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेत नवीन गावे समाविष्ट झाल्यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढ झाली आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीमध्ये जागा अपुरी पडत आहे. या संदर्भात पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी २४३ कोटी रुपये इतक्या रकमेचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर केले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाने तांत्रिक मान्यता दिली आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पोलिस आयुक्त कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी १९३ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

या नव्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. नव्या इमारतीच्या बांधकामाचा नकाशास वास्तुशास्त्र तज्ज्ञांकडून मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर निविदा मागवून आणि प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाल्यानंतर बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment