‘हरहर महादेव जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषाने शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुख्य सभा मंडप दुमदुमूला.

PCC NEWS

‘हरहर महादेव जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषाने शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुख्य सभा मंडप दुमदुमूला.

पिंपरी –  चिंचवड : लाठ्या काठ्या, ढोल- ताशा, झांज पाथक, मर्दानी खेळ, पोवाडा, शाहीर, गोंधळी, करपल्लवी  आदींच्या सादरीकरणाने आज १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात शिवराज्याभिषेक सोहळा अवतरला. रोमहर्षक अशा या सोहळ्यावेळी ‘हरहर महादेव….जय भवानी जय शिवाजी…’ च्या जयघोषाने मुख्य सभा मंडप दुमदुमून गेला.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज नाट्य संमेलनात ‘प्रभो शिवाजी राजा’ हा कार्यक्रम पृथ्वी इनोव्हेशनच्या वतीने सादर करण्यात आला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर,अभिनेते नागेश भोसले, सुशांत शेलार, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार  साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची कहाणी म्हणजे साहसाची मालिकाच आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवबाचा जन्म, अफजखानाचा वध ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला. गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर शाहीर यशवंत जाधव यांनी शिव जन्माचा ‘एके काळी सह्याद्री हसला’ हा रोमहर्षक पोवाडा सादर केला. त्यानंतर ठाकर नृत्य, कोळी गीत सादर करण्यात आले.

त्यानंतर करपल्लवी या आगळ्या वेगळ्या सादरीकरणातून शिवकाळात गोंधळ मधून सांकेतिक भाषा कशी वापरली जायची, याचे सुरेख सादरीकरण  केले. या संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान शिवाजी महाराजांची आज्ञा पत्रांचे वाचन, वासुदेव, भालरी देवा भलारी, विठ्ठल माऊली , बाल शिवबाचा पाळणा अन् शेवटी मर्दानी खेळांच्या सादरीकरणात शिवराज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला. अवघी शिवसृष्टी उभी केलेल्या या नेत्रदीप सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

यावेळी अभिनेते नागेश भोसले यांच्या हस्ते सादरकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भोसले म्हणाले, शिव राज्याभिषेक कोणताही असो, तो पाहताना अंगावर शहारे येतातच. आता झालेले सादरीकरण हे उत्तूग, अभिनिव आहे. खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटले.

गौरी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment