बजाज ऑटो फाउंडेशनच्या ‘एसएसके सखी दिवाळी प्रदर्शनाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद!

SSK PCMC

PCC NEWS
3 Min Read
SSK PCMC NEWS

बजाज ऑटो फाउंडेशनच्या ‘एसएसके सखी दिवाळी प्रदर्शनाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद!

महिला सक्षमीकरणासाठी फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – गीतांजली देशपांडे

प्रतिनिधी : युनूस खतीब पिंपरी-चिंचवड

आकुर्डी : बजाज ऑटो फाउंडेशनच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांना महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘एसएसके सखी दिवाळी प्रदर्शनाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महिला उद्योजिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे बजाज ऑटो फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणेच्या उपाध्यक्ष (व्हाईस चेअरपर्सन) गीतांजली देशपांडे यांनी व्यक्त केले.

बजाज ऑटो फाउंडेशन, आकुर्डी यांच्या वतीने महिला सबलीकरणाच्या उद्देशाने ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चार दिवसीय ‘एसएसके सखी दिवाळी प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गीतांजली देशपांडे तसेच सायबर पोलीस स्टेशनच्या ईश्वरी आंबरे आणि भावना प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे तब्बल १०८ महिला स्टॉलधारकांचा सहभाग. विशेष म्हणजे या महिलांना स्टॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रदर्शनात दिवाळीच्या पारंपरिक साहित्यापासून ते आधुनिक वस्तूंपर्यंत विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये आकर्षक आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, कपडे, ज्वेलरी, दिवाळी फराळ तसेच विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. कमी दरात उत्तम दर्जाच्या वस्तू उपलब्ध करून देणे हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरत आहे.

बजाज ऑटो फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या ११ वर्षांपासून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमातून अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली असून, काही महिलांनी या व्यासपीठाच्या माध्यमातून आपला व्यवसाय विस्तारला आहे. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ खरेदी-विक्रीचे माध्यम न राहता महिला उद्योजिकांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारे व्यासपीठ ठरत आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना गीतांजली देशपांडे म्हणाल्या, “महिलांनी पूर्ण तयारीनिशी आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून कोणत्याही क्षेत्रात प्रवेश केला, तर त्या निश्चितच यशस्वी होऊ शकतात. महिलांना संधी आणि योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतात. बजाज ऑटो फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी दिले जाणारे प्रोत्साहन आणि सहकार्य महत्त्वपूर्ण आहे.”

दरम्यान, सायबर पोलीस स्टेशनच्या भावना प्रधान आणि ईश्वरी आंबरे यांनी उपस्थितांना दिवाळीच्या सणादरम्यान वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत सावध केले. ऑनलाइन खरेदी, अनोळखी लिंक, बनावट ऑफर्स, ओटीपी आणि आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सणासुदीच्या काळात आकर्षक आमिषांना बळी न पडता प्रत्येक ऑनलाइन व्यवहाराची खातरजमा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ, गेम शो, डान्स स्पर्धा, ‘एसएसके सखी सम्राज्ञी’ यांसह विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खरेदीसोबतच मनोरंजनाची मेजवानीही नागरिकांना अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाला बजाज ऑटोचे उपाध्यक्ष (सीएसआर) सुधाकर गुडीपती आणि बजाज ऑटो फाउंडेशनच्या शीतल धमेचा यांची उपस्थिती होती. चार दिवसीय प्रदर्शनाचे नियोजन बजाज ऑटो फाउंडेशनच्या अनुजा सप्ताश्व आणि स्वाती देशपांडे यांनी केले आहे.

महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला ग्राहक मिळवून देण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

TAGGED: ,
Share This Article
Leave a comment