भोसरीत मालमत्ता व्यवहाराच्या नावाखाली ४२ लाखांची फसवणूक

PCC NEWS
2 Min Read
Pccnews PCMC

भोसरीत मालमत्ता व्यवहाराच्या नावाखाली ४२ लाखांची फसवणूक

दुकान आणि गोडाऊन विक्रीचे आमिष; उद्योजकाला गंडा घालणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

अनेकांना फसवल्याची शक्यता; भोसरी पोलिसांकडून तपास सुरू

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी भोसरी परिसरात मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराच्या नावाखाली एका उद्योजकाची तब्बल ४२ लाख २६ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकान आणि गोडाऊन विकण्याचे आमिष दाखवत मोठी रक्कम उकळूनही मालमत्ता नावावर करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी देवेद्रसिंग हरभजनसिंग आनंद (वय ५०) आणि त्यांची पत्नी विणू देवेंद्रसिंग आनंद (वय ४५, रा. कासारवाडी, दापोडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, विकास मानचंद गोयल (वय ४३, रा. वाकड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास गोयल यांचा ‘मास्टर फॅब’ नावाचा उद्योग असून त्यांची आरोपी देवेंद्रसिंग आनंद यांच्याशी गेल्या नऊ वर्षांपासून ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी सप्टेंबर २०१८ मध्ये भोसरी येथील ‘कुणाल पुरम’ योजनेतील दुकान आणि त्यासमोरील गोडाऊन विकण्याचा प्रस्ताव गोयल यांच्यासमोर ठेवला. हा व्यवहार तब्बल दोन कोटी रुपयांत ठरविण्यात आला होता.

विश्वास संपादन करून आरोपींनी सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत वेळोवेळी फिर्यादींकडून मोठी रक्कम स्वीकारली. मात्र, मालमत्ता नावावर करून देण्याऐवजी आरोपींनी घेतलेले पैसे स्वतःच्या व्यवसायासाठी तसेच बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्तेचा ताबा अथवा कागदपत्रे न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भोसरी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणात संबंधित दाम्पत्याने आणखी काही जणांना देखील अशाच प्रकारे गंडा घातल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. मालमत्ता व्यवहारांमध्ये विश्वासाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी व्यवहार करताना कागदपत्रांची पडताळणी करूनच आर्थिक देवाणघेवाण करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment