पिंपरी-चिंचवड महापालिकेला नवे आयुक्त; डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती

PCC NEWS
2 Min Read
Pccnews Reporter Yunus Khatib

पिंपरी-चिंचवड महापालिकेला नवे आयुक्त; डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (दि. ११) यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला. सध्या कोकण विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. सूर्यवंशी यांची बदली करून त्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे.

शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त पद अधिकालिक वेतन श्रेणीत उन्नत करण्यात आले असून त्या पदावर डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्याकडे सोपवून तातडीने पिंपरी-चिंचवड येथे नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

सध्या महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले श्रावण हर्डीकर यांच्याकडून डॉ. सूर्यवंशी यांनी लवकरात लवकर पदभार स्वीकारावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचा बदल होणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, नव्या पदावर रुजू झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी “सुप्रिमो” प्रणालीवर आपला रूजू अहवाल अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच ईआर शीटमधील पोस्टिंग कॉलममध्ये माहिती नोंदवून ती सामान्य प्रशासन विभागाला कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कार्यभार हस्तांतरण आणि स्वीकार प्रक्रियेदरम्यान १७ नोव्हेंबर २०२० रोजी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद आहे. तसेच नव्या पदस्थापनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल आणि कार्यमूल्यांकन अहवाल नियमानुसार व वेळेत तयार करण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे.

याशिवाय, महापालिकेच्या कामकाजात डिजिटल प्रणालींचा वापर वाढवण्यावर शासनाने भर दिला आहे. ई-ऑफिस तसेच e-HRMS प्रणालीचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही नव्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

Share This Article
Leave a comment