पुण्यात पहिल्या महिला (अल्पसंख्यक) विद्यापीठाच्या स्थापनेसाठी पुढाकार

PCC NEWS
2 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजReporter Yunus Khatib

पुण्यात पहिल्या महिला (अल्पसंख्यक) विद्यापीठाच्या स्थापनेसाठी पुढाकार

पुणे दिनांक 31 जानेवारी 2026

(प्रतिनिधी युनूस खतीब)

पुणे : भारतातील पहिल्या महिला (अल्पसंख्यक) विद्यापीठाच्या स्थापनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून, शिक्षण हक्क मंचच्या प्रतिनिधिमंडळाने पुणे विभागाच्या प्रादेशिक वक्फ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महिला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिला उच्च शिक्षण अत्यावश्यक असल्याचे प्रतिनिधिमंडळाने सांगितले.

महिलांच्या शिक्षणामुळे संपूर्ण समाजाच्या येणाऱ्या पिढ्या शिक्षित होतात. आज देशभरात शिक्षण, रोजगार, राजकारण आदी क्षेत्रांत महिलांना समान संधी दिल्या जात असताना, मुस्लिम समाजाकडे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र कॉलेज किंवा विद्यापीठ नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार वक्फ जमिनीचा उपयोग शिक्षण व रोजगारासाठी प्राधान्याने करणे आवश्यक आहे. याच नियमांच्या आधारे पुणे येथील कात्रज-कोंढवा परिसरातील वक्फ जमीन महिला (अल्पसंख्यक) विद्यापीठाच्या स्थापनेसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या विद्यापीठाच्या माध्यमातून महिलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, रोजगारनिर्मिती करणे आणि त्यांचे सशक्तीकरण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या शिष्टमंडळात आयेशा शेख, किरण शेख, शबाना खान, सारा सौदागर, शबाना काझी, नसरीन सय्यद, मतीन मुजावर, चांदभाई बलबट्टी, फिरोज मुल्ला, साबिर शेख, फिरोज खान, अख्तर शेख, तौहीद अन्सारी, अकबर खान, इस्माईल शेख, दुलभाई पीरजादे यांचा समावेश होता.

यावेळी शिक्षण हक्क डेव्हलपमेंट रिसर्च अँड प्रमोशन मंचचे प्रतिनिधी मतीन मुजावर यांनी समाजातील प्रत्येकाने आपल्या मुलांना शिक्षित करण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील शिक्षित वर्गाने मस्जिदांच्या माध्यमातून शैक्षणिक परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी घ्यावी, असे मत व्यक्त करण्यात आले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment