युवासेना उपशहर प्रमुख निखिल उमाकांत दळवी यांना जीवे मारण्याची धमकी

PCC NEWS
3 Min Read
PccnewsPccnews

युवासेना उपशहर प्रमुख निखिल उमाकांत दळवी
यांना जीवे मारण्याची धमकी

क्रिकेट स्पर्धेच्या तयारीत दादागिरी; शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी – युवासेना पदाधिकाऱ्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी): ठाकरे शिवसेना चषक हाफ पीच क्रिकेट स्पर्धेच्या तयारीदरम्यान युवासेना पदाधिकाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. गिरीश गोपाळ कुटे यांनी आरक्षित मनपा भूखंडावर दादागिरी करत धमकावल्याचा आरोप निखिल उमाकांत दळवी (युवासेना उपशहर प्रमुख – पिंपरी चिंचवड) यांनी केला आहे.

दळवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ठाकरे गटाच्या वतीने आयोजित ‘ठाकरे शिवसेना चषक क्रिकेट टूर्नामेंट’साठी आकुर्डीतील विठ्ठलवाडी परिसरातील विठ्ठल–रुक्मिणी मंदिरासमोरील संत तुकाराम महाराज पालखी तळ हा मनपाकडील आरक्षित भूखंड महानगरपालिकेकडून अधिकृतरीत्या भाडेतत्त्वावर पाच दिवसांसाठी (१० ते १५ डिसेंबर) घेतला होता. यासाठी १३,०८० रुपयांचे भाडेही नियमाप्रमाणे जमा करण्यात आले आहे.

मात्र, मंगळवार (९ डिसेंबर) रोजी रात्री सुमारे १० वाजता मंडप मोजमाप व तयारीसाठी दळवी, त्यांचे सहकारी व मंडप कर्मचारी जागेवर पोहोचले असता, गिरीश गोपाळ कुटे हे अचानक तेथे आले. त्यांनी जागा त्यांच्या मालकीची असल्याचे सांगत दादागिरी सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यांनी दळवी यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करून “इथं कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही”, “धक्का दिला, मारणार पण… मारून टाकणार पण”, अशी उघड धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दळवी यांनी सांगितले की, “जागा मनपाकडील असून ती अधिकृतरीत्या भाड्याने घेतली आहे” असे स्पष्ट केल्यावरही कुटे यांनी धमक्यांचा सूर कायम ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, “आम्ही गाववाले आहोत, तुम्ही बाहेरून आलेले भाडेकरू; नीट राहा नाहीतर परिणाम भोगावे लागतील” असे म्हणत धमकी अधिक तीव्र केल्याचेही दळवी यांनी नमूद केले.

घटनेनंतर दळवी यांनी तात्काळ ‘११२’ या आपत्कालीन पोलिस हेल्पलाइनवर फोन करून तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली व निगडी पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद देण्याचे सुचवले. त्यानुसार दळवी यांनी लेखी तक्रार व NCR नोंद केली आहे.

दळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गिरीश गोपाळ कुटे यांच्या धमक्यांमुळे माझ्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. भविष्यात काही अनिष्ट घडल्यास त्याला जबाबदार धरण्यात यावे.” त्यांनी पोलीस आयुक्तांकडे दखलपात्र गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment