१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन लावणी महोत्सव, काव्य पहाट, लोकनृत्य, एकांकिकेने नाट्य संमेलनाचा दूसरा दिवस गाजवला.

PCC NEWS

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन.

लावणी महोत्सव, काव्य पहाट, लोकनृत्य, एकांकिकेने नाट्य संमेलनाचा दूसरा दिवस गाजवला.

पिंपरी – चिंचवड : लावणी महोत्सव, काव्य पहाट, लोकनृत्य, एकांकिका अन् अनेक नाटकांच्या सादरीकरणाने आज शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा दुसरा दिवस गाजवला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नाट्य रसिकांनी नाट्य संमेलनाच्या सर्वच ठिकाणी मोठी गर्दी केली होती. या नाट्य संमेलनाच्या रूपाने पिंपरी – चिंचवडकरांनी सांस्कृतिक मेजवानी अनुभवल्याचे चित्र होते. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी ग.दि माडगूळकर नाट्यगृहातील कार्यक्रमाची सुरूवात ही काव्य पहाटेने झाली. त्यानंतर तपस्विनी संस्था यांच्या वतीने गणेश वंदना सादर करण्यात आली.वर्ध्याच्या अध्ययन भारतीय संच टीमने ‘तेरवं’हे दोन अंकी प्रायोगिक नाटक सादर करण्यात आले. या नाटकामध्ये शेतकऱ्यांच्या मुली,घटस्फोटीत महिला,पीएचडी करणाऱ्या महिला यांनी अत्यंत ताकदीने अभिनय करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले. स्त्री शिक्षण आणि स्त्री जागर हा या नाटकाचा विषय होता. नगरचे रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी यांच्या हस्ते या संचाचा गौरव करण्यात आला. त्यानंतर राखाडी स्टुडिओ निर्मित ‘उच्छाद’ हे विनोदी नाटक सादर करण्यात आले. या नाटकाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर डॉ. सुमेधा गाडेकर यांच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित नृत्य नाटिका सादर केली. या कार्यक्रमासाठी ज्योती कानिटकर, चंद्रशेखर जोशी आणि डी. वाय. पाटील कॉलेजचे विद्यार्थ्यांचा सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास कहाणे यांनी केले.

पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात दुपारी रंगभूमी सेवक संघ, पुणे यांचे  व लेखक-दिग्दर्शक आनंद जोशी यांचे ‘गेम ऑफ पॉवर’ हे नाटक सादर करण्यात आले. या प्रसंगी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर व अभिनेत्री स्वाती चिटणीस,निळू फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक प्रा. मंगेश दळवी आदी उपस्थित होते.सायंकाळी अभिजात क्रियेशन्स आणि मिलाप थिएटर टुगेदर यांचे ‘चाणक्य हे नाटक सादर झाले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथील कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी अभिनेते प्रदीप खबरे, संजय देसाई, उदयराजे शिंदे, गिरीश महाजन, दादासाहेब साळुंखे, उज्वल देशमुख, नंदकिशोर कवळकर आणि ज्येष्ठ पत्रकार शितल कर्दे उपस्थित होते. त्यानंतर  ‘नृत्य गाथा’ या संस्थेच्या विद्यार्थी श्रध्दा कालमित्रा आणि करूणा गुरव यांनी गणेश वंदना सादर केली. यानंतर ‘लावण्य तारका’ हा लावणीचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमानंतर डॉ. भावार्थ देखणे यांचा भारुडाचा अप्रतिम कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत यचकल यांनी केले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment