अन् नाट्य संमेलनात रंगली काव्य पहाट.
पिंपरी – चिंचवड : पहाटेची गुलाबी थंडी, दर्दी रसिक श्रोते अन् स्वयंस्फूर्तीने आलेल्या काव्याने आज १०० व्या नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीची पहाट संस्मरणीय ठरली.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रविवारी ग. दि. माडगूळकर सभागृहाच्या प्रागंणात “.. आणि कविता – काव्य पहाट’ हा कार्यक्रम रंगला. नाट्य संमेलनात प्रथमच काव्य पहाट हा कार्यक्रम रंगला. गीतकार वैभव जोशी आणि कवी संदीप खरे यांनी हा बहारदार कार्यक्रम सादर केला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला,उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपस्थित होते.
पहाटेच्या वेळी उद्योग नगरीत रंगलेल्या या काव्य पहाटने सांस्कृतिक वातावरण निर्मिती झाली. सकाळच्या वेळी जसजसा कार्यक्रम रंगत गेला तसा गीतकार वैभव जोशी आणि कवी संदीप खरे यांनी सादर केलेल्या कवितांची रंगत आणखी वाढत गेली. यावेळी वगेरे वगेरे .. व संदीप खरे यांनी सादर केलेल्या ‘गगन जाई ..’ या कवितांना रासिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्य संमेलनाच्या १०० वर्षात काव्य पहाट झालेली नाही. आज १०० व्या वर्षी हे पहिल्यांदाच घडत आहे. आपली काव्य परंपरा खूप मोठी आहे. संत कवी, दंत कवी, पंथ कवी ते अगदी कुसूमाग्रजांपासून आधुनिक कवीं पर्यंत ती आहे. अशी रत्न आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्मल्याने ही काव्य परंपरा जीवंत आहे.