राजकीय जाहिरातींच्या बल्क एसएमएसचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे.

PCC NEWS

राजकीय जाहिरातींच्या बल्क एसएमएसचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे.

खासगी एफ.एम. वाहिन्यांनीही जाहिरात प्रसारणापूर्वी प्रमाणीकरण झाल्याची खात्री करावी.

पुणे, दि. १५ : निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हाईस मेसेजेस यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच रेडिओ आणि खासगी एफएम वाहिन्यांसाठीही या तरतुदी लागू असून जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबींचा खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्याचे प्रतिनिधी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्सच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, जिल्हा दळणवळण आराखड्याच्या समन्वय अधिकारी शमा पवार आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. निवडणूक प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रचाराचं संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे सर्व माध्यमातून होत असलेल्या निवडणूक प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पूर्वप्रमाणिकरण न करता बल्क एसएमएस पाठविले जात असल्याचे किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जाहिरात प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल अशा प्रकारची कोणतीही पोस्ट नागरिकांनी समाजमाध्यमांवरुन करू नये. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीशी (एमसीएमसी) जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून सर्वोपचार रुग्णालयासमोर, पुणे ४११००१ दूरध्वनी क्र. ०२०-२६१२१३०७, ई-मेल diopune@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment