चिंचवडमध्ये हजारो रामभक्तांचे सामूहिक रामरक्षा पठण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा होत आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप आणि पिंपरी-चिंचवड शहर संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या वतीने चिंचवड, केशवनगर येथे सामूहिक श्री रामरक्षा स्त्रोत पठण घेण्यात आले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील शेकडो रामभक्तांनी व विद्यार्थ्यांनी सामूहिक रामरक्षा स्त्रोत पठण केले. या धार्मिक सोहळ्यात रामभक्तांनी श्रद्धापूर्वक व आत्यंतिक उत्साहाने भाग घेतला. त्यामुळे सगळीकडे रामनामाची चैतन्य गंगा वाहत होती.
चिंचवडगाव, केशवनगर येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडांगण येथे हा उपक्रम पार पडला. या सोहळ्याला प्रसिद्ध निवेदक व अभिनेते राहुल सोलापूरकर, पद्मश्री गिरीश प्रभुणे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे अध्यक्ष हभप किसन महाराज चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा कार्यवाह माहेश्वर मराठे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री धनंजय गावडे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल सोलापूरकर म्हणाले, “अयोध्येचा इतिहास फार जुना आहे. अनेक मुस्लिम राजांनी अयोध्येवर आक्रमणे केली. रामजन्मभूमीसाठी इसवी सनपूर्व १५० पासून ८९ लाढाया झाल्या आहेत. साडेचार लाख रामभक्तांनी बलिदान दिलेले आहे. आपली आहुती दिलेल्या रामभक्तांचे आपण सर्वांनी स्मरण केले पाहिजे. अयोध्या ही अमृत भूमी आहे. युद्ध करूनही जिंकता येत नाही, अशी ती भूमी आहे. १६ व्या शतकात बाबराने अयोध्येवर हल्ला केला. त्याने राम मंदिराच्या ठिकाणी मस्जिद उभारली. रामजन्मभूमीचा लढा शेवटी कोर्टामार्फत जिंकावे लागले. प्रभू श्रीराम मर्यादा पुरूषोत्तम होते. आता अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे. या मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. ही प्राणप्रतिष्ठापना म्हणजे हिंदूराष्ट्रचा श्रीगणेशा असल्याचे त्यांनी सांगितले.”
शंकर जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमधील ३ हजार मंदिराममध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे जल्लोषात व आनंदात स्वागत केले जाणार आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे सात लाख घरांपर्यंत मंगल अक्षतांचे वाटप करण्यात आले आहे. श्री रामरक्षा हे अद्भुत स्त्रोत आहे. त्यात राम शब्द वेगवेगळ्या व्याकरणीय पद्धतीने साधारणपणे ७७ वेळा येतो. विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याचे पुण्य एकदा रामरक्षा म्हटल्याने मिळते. याच उदात्त उद्देशाने प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी एकत्र येऊन रामरक्षा स्त्रोत पठण सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.”यावेळी विनोद बन्सल यांनीही मनोगत व्यक्त केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले.