डॉ.कृष्णकुमार गोयल हे पुण्याचे कोहिनूर-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

PCC NEWS

डॉ.कृष्णकुमार गोयल हे पुण्याचे कोहिनूर-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

पुणे दि.१८: डॉ.कृष्णकुमार गोयल यांनी पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात चांगुलपणा वाढविण्याचे कार्य केले आहे. त्यांना गुरूवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार प्रदान करणे त्यांच्या या कार्याचा हा सन्मान आहे. ते खऱ्या अर्थाने पुण्याचे कोहिनूर आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित गुरुवर्य शंकररराव कानिटकर पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्री. मुनगंटीवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, पुरस्कार्थी तथा खडकी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.कृष्णकुमार गोयल, प्रा.अरविंद पांडे, सुरेश तोडकर, श्रीमती राजमाला गोयल, डॉ.जोत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, आज समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची गरज आहे. डॉ.कृष्णकुमार गोयल सेवाभावी मार्गावर आपल्या कर्तृत्वाच्या आधारे पुढे जात आहेत. ते शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांना सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील कामामुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा चांगल्या व्यक्तींमुळे समाजाच्या प्रगतीत हातभार लागतो, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, जगात आज संपत्ती पेक्षा गुणांना महत्व दिले जात आहे. ज्ञानाला संस्काराची जोड असल्यास विद्यार्थी समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करतात. शिक्षणाच्या माध्यमातून एकता, शांतता, संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून कार्य होत आहेत आणि तसे विद्यार्थी घडत आहेत. एखाद्या व्यक्तीला मिळणारा पुरसकार हा एका व्यक्तीचा गौरव नसून त्या मार्गावर जाणाऱ्या अनेकांचा तो गौरव असतो. इतरांसाठी चांगले काम करण्यासाठीची ती प्रेरणा असते. म्हणून संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार महत्वाचा आहे, असेही श्री.मुनगंटीवार म्हणाले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य असून संस्थेचे रुपांतर लवकरच मॉडर्न विद्यापीठात व्हावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

आमदार शिरोळे म्हणाले, डॉ.गोयल यांनी विविध क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना मदतीचा हात दिला. समाजाची सेवा करण्याविषयीची संवेदनशीलता त्यांच्यात आहे. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे दातृत्व, साधेपणा, नम्रता आणि संस्काराचे मिश्रण आहे. त्यांचे जीवन युवा पिढीला प्रेरक आहे. असे व्यक्तीमत्व समाजात आशावाद जागवतात.

डॉ.गोयल म्हणाले, पुरस्काराच्या नावाने त्या पुरस्काराचे महत्व लक्षात येते. म्हणूनच गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा आयुष्यातील सुवर्णक्षण आहे. या पुरस्काराने कामाचा सन्मान होणे प्रेरणा देणारी बाब आहे. पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे हा पुरस्कार दिला जात असल्याने त्याचे वेगळेच महत्व आहे. पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील मागील घटनांचा मागोवा घेता आला. जिद्दीने परिस्थितीला सामोरे गेल्यास यशाचे शिखर गाठता येते हे यानिमित्ताने पुन्हा एकदा लक्षात आले. विविध क्षेत्रात काम केल्याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.

समाजातील प्रामाणिक व्यक्तिमत्वाला पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे नमूद करून डॉ.करमळकर म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. गुणवान व्यक्तींचा सन्मान ही या भूमिची परंपरा आहे. पुण्यातील शैक्षणिक क्षेत्राला गती देण्याचे काम अनेक संस्था आणि व्यक्तींनी केले. अशा गुरुवर्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणे ही समाधानाची बाब आहे. शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारपूर्ण व्यक्तिमत्व घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.गजानन एकबोटे म्हणाले, गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. त्यांना पुरस्कार प्रदान करण्याच्या निमित्ताने चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा सत्कार होत आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव शामकांत देशमुख यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती दिली आणि पुरस्कारामागची कल्पना विषद केली. आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.मुनगंटीवार यांच्या ऑनलाईन उपस्थितीत डॉ.गोयल यांना त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि सहकार क्षेत्रातील कामाबद्दल गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment