स्थानिक राजकारण की पक्षाची धोरणात्मक चूक? संतोष म्हस्के प्रकरणाने भाजपसमोर प्रश्नचिन्ह

PCC NEWS
2 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब

स्थानिक राजकारण की पक्षाची धोरणात्मक चूक? संतोष म्हस्के प्रकरणाने भाजपसमोर प्रश्नचिन्ह

पिंपरी चिंचवड दिनांक:31 गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारे प्रभाग क्रमांक १६ मधील निष्ठावान कार्यकर्ते संतोष म्हस्के यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि स्थानिक राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पक्षाशी एकनिष्ठ राहून आम्ही चूक केली का?” असा थेट आणि आर्त सवाल त्यांनी उपस्थित केल्याने चिंचवडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

संतोष म्हस्के हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे खंबीर व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अश्विनीताई जगताप यांच्या विजयासाठी त्यांनी जीवाचे रान केले होते. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही आमदार शंकर जगताप यांच्या प्रचारात मुख्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मात्र, एवढ्या वर्षांची निष्ठा, सातत्यपूर्ण काम आणि संघटनेसाठी दिलेले योगदान असूनही उमेदवारी देताना त्यांच्या नावाचा विचार न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
उमेदवारी न मिळाल्याबाबत बोलताना संतोष म्हस्के यांनी थेट आरोप करत सांगितले की, “काही गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक राजकारण करून मला उमेदवारीपासून वंचित ठेवले. पक्षासाठी रक्त आटवले, संघटना मजबूत केली; पण संधी देण्याची वेळ आली तेव्हा स्थानिक हेवेदाव्यापोटी मला डावलण्यात आले. हे मी कदापि मान्य करणार नाही.”

दहा वर्षे पक्षाशी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी न देणे हा केवळ माझा नव्हे, तर माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचा अपमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, शिस्त पाळली; ही आमची चूक ठरली का?” असा सवाल त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर उपस्थित केला आहे.

संतोष म्हस्के यांच्या या जाहीर पवित्र्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment