शभराव्या नाट्य संमेलनाच्या पूर्व संध्येला बाल नाटय नगरी गजबजली.

PCC NEWS

शभराव्या नाट्य संमेलनाच्या पूर्व संध्येला बाल नाटय नगरी गजबजली.

पिंपरी: शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उद्यापासून उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात रंगणार आहे. नाट्य संमेलनाच्या पूर्व संध्येला बाल नाटयनगरी लहान मुलांच्या आगमनाने गजबजून गेली होती.

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या पूर्व संध्येला भोईर नगर येथील मैदानावर बालनाट्य रंगभूमी नगरी येथे कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक, नाटय परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजेंद्र जैन, कलापिनी संस्थेचे डॉ. अनंत परांजपे, बाल रंगभूमीच्या दीपाली शेळके, ज्येष्ठ कवी माधुरी ओक, रुपाली पाथरे, मयुरी आपटे जेजुरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, कला क्षेत्राने मला खूप आधार दिला, माझ्या जगण्याला नवी दिशा दिली आहे. उद्यापासून सुरु होत असलेले १०० वे नाटय संमेलन ही माझ्या २७ वर्षापासून सुरू असलेल्या वाटचालीची फलनिष्पत्ती आहे असे मला वाटते. नाटय संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल नाटय नगरी साकारण्यात आली आहे. शहरातील पालकांनी आपल्या मुलांना पुढील दोन दिवस इथे घेऊन यावे कारण नाटक हे संस्कार घडवणारे माध्यम आहे.

पूर्व संध्येला आर एम डी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘दशावतार’ हे बालनाट्य सादर करत उपस्थित बालकांची मने जिंकली. ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल तो आला आला’ ही नाटिका करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात उद्या नाट्य संमेलना निमित्त नाट्य प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असलेल्या सर्व नाट्यगृहातील रंगमंचाचे पुजन भाऊसाहेब भोईर आणि मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात अभिनेते भारत जाधव यांच्या ‘ अस्तित्व ‘ तर नट सम्राट निळू फुले नाट्यगृह, सांगवी येथे ‘आडलय का?’ या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग रंगला.

Share This Article
Leave a comment