मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरेंचा उमेदवारी अर्ज दाखल.

PCC NEWS

भव्य रॅली, पदयात्रेसह जोरदार शक्तीप्रदर्शन करीत संजोग वाघेरेंचा उमेदवारी अर्ज दाखल.

आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, अमोलकोल्हे, रोहित पवारांची उपस्थिती.महाविकास आघाडीच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते‌ सहभागी.पिंपरी, दि. 23 ( प्रसिद्ध प्रमुख युनूस खतीब) महापुरुषांना अभिवादन करून आणि आराध्य दैवतांच्या मंदिरात आशिर्वाद घेऊन, तसेच भव्य दुचाकी रॅली, पदयात्रेने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे संजोग वाघेरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार, कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप, जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील, कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, जे. एम. म्हात्रे, माऊली दाभाडे, जगन्नाथ शेवाळे आदी उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी पिंपरीगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन व ग्रामदेवत भैरवनाथ मंदिरात आशिर्वाद घेऊन दुचाकी रॅलीस सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे स्मारक, चिंचवडगावात क्रांतीवीर चापेकरांच्या स्मारकास अभिवादन, महासाधू मोरया गोसावी मंदिरात आशिर्वाद घेऊन रॅली आकुर्डीतील खंडोबा माळ येथे पोहोचली. खंडोबा मंदिरात आशिर्वाद घेऊन परिवर्तन रथातून संजोग वाघेरेंसह महाविकास आघाडीचे नेते अभिवादन करत पदयात्रेची सुरुवात झाली. संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आकुर्डी प्राधिकरणातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा पोहोचली.

या पदयात्रेत युवासेनेचे प्रमुख तथा माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा आमदार सचिन अहिर, जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, प्रचारप्रमुख योगेश बाबर, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष तुषार कामठे, आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, आम आदमी पार्टी शहराध्यक्ष मीना जावळे, संतोष इंगळे, युवासेनेचे चेतन (अण्णा) पवार, समाजवादी पक्षाचे बि.डी. यादव, ज्योतीताई निंबाळकर, शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे, उपजिल्हा समितीच्या वैशालीताई मराठे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक अनंत को-हाळे, बाबू नायर, माजी नगरसेविका शिवसेना नेत्या सुलभा उभाळे, सुलाक्षणा शिलवंत – धर, दस्तगीर मणियार, प्रचार प्रमुख योगेश बाबर, रोमी संधू, कामगार नेते काशिनाथ नखाते, इम्रान शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष, तसेच इतर सर्व पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी‌ व‌ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदयात्रेत “महाविकास आघाडीचा विजय असो”, “संजोग वाघेरे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “गद्दारांना भरला घडा, त्यांना शिकवू धडा”, “एकजुटीने जागवा, निर्धार भगवा”, “आता हवा, खासदार नवा”, “आली रे आली, पाटलांची बारी आली” अशा घोषणांनी देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तर हातात घेतलेले मशाल चिन्ह, भगवे झेंडे, भगवे उपरणे, टोप्या अशा यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.

पदयात्रेत घुमला “जय भवानी, जय शिवाजी”चा नारा.

उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना दुचाकी रॅली व संपूर्ण पदयात्रेत निष्ठावंत शिवसैनिकांचा “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”अशा घोषणा देत उत्साह संचारत होता. तर, “स्वाभीमानी महाराष्ट्राचा बुलंद आवाज, उध्दव ठाकरे… उध्दव ठाकरे…” अशा घोषणांमधून खरी शिवसेना एकच असल्याचे चित्र शिवसैनिकांनी पदयात्रेतूनच दाखवून दिले.

विजयाला गुलाल उधळणार: संजोग वाघेरे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, “देशाची लोकसभा निवडणूक सर्वार्थाने महत्त्वपूर्ण आहे. जनहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणा-या, देशातील जनतेची फसवणूक करणा-या प्रवृत्तीविरुध्द ही निवडणूक होत आहे. महागाई, बेरोजगारीविरुध्द आणि दडपशाहीच्या राजकारणाविरोधात निर्णय घेण्यासाठी मतदार तयार आहेत. पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघात गद्दारी गाडली जाईल‌ आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय होईल. स्वाभीमानी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळचा गड कायम राखणार आहे. महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता विजयाला गुलाल उधळणार आहे”.

औक्षण करून कुटुंबांच्या शुभेच्छा अन् ग्रामस्थांचे पाठबळ.

संजोग वाघेरे पाटील हे अर्ज दाखल करायला निघण्यापूर्वी पिंपरीगाव येथील त्यांच्या निवासस्थानी वाघेरे यांना पत्नी उषाताई वाघेरे पाटील यांच्यासह महिला वर्गाने त्यांचे औक्षण करून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसले, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, परिवारातील सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कुटुंबातील सदस्यांसह ज्येष्ठ-श्रेष्ठ सर्व ग्रामस्थांनी संजोग वाघेरेंच्या विजयासाठी पाठिशी उभा राहण्याचे आशिर्वाद दिले.

“तोच वसा आणि वारसा” घेऊन वाटचाल…

अर्ज दाखल करायला जाताना संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांचे वडील दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या पिंपरीतील पुतळ्यास अभिवादन करून आशिर्वाद घेतले. पिंपरीगावचे सरपंच ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर असा राजकीय प्रवास, तसेच जनमाणसात मिसळणारे व्य़क्तीमत्व म्हणून कार्याचा, कर्तृत्वाचा वेगळा ठसा त्यांनी शहराच्या राजकारणावर उमटवला होता. त्यांचे आशिर्वाद घेऊन तोच नम्र स्वभावाचा आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा संजोग वाघेरे पाटील चालवत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a comment