पिंपरी–चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपतींचे गुणवत्ता सेवा पदक

पिंपरी चिंचवड सिटी न्यूज

PCC NEWS
2 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब

पिंपरी–चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपतींचे गुणवत्ता सेवा पदक

पिंपरी–चिंचवड, दि. २५ जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी–चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपतींचे पोलिस दलातील गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावान व उत्कृष्ट सेवेसाठी हा बहुमान देण्यात येणार असून, त्यांच्या कारकिर्दीतील हे दुसरे राष्ट्रपती पदक ठरले आहे.

विठ्ठल कुबडे यांनी १५ सप्टेंबर १९९३ रोजी महाराष्ट्र पोलिस सेवेत प्रवेश केला. प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली नियुक्ती भंडारा येथे झाली. त्यानंतर त्यांनी गोरेगाव, सालेकसा, शिवहोरा यांसारख्या नक्षल प्रभावित भागांत सेवा बजावत नक्षली कारवायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पुढील काळात परभणी, नांदेड, लातूर तसेच बुलडाणा येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. लातूर जिल्ह्यात २००७ ते २०१५ या कालावधीत त्यांनी प्रभावी काम केले.

१५ जून २०१५ रोजी त्यांची पिंपरी येथे नियुक्ती झाली. १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी–चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेच्या दिवशीच त्यांना प्रथमच राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा हा मान मिळाल्याने त्यांच्या कार्याचा विशेष गौरव झाला आहे.

सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुन्हे शाखा, वाहतूक व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध व विविध विशेष कारवायांमध्ये प्रभावी नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात येऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेली.

सेवाकाळात त्यांना १२०० हून अधिक रिवॉर्ड्स, ४५० पेक्षा जास्त प्रशंसापत्रे, नक्षल प्रभावित भागातील कामासाठी विशेष सेवा पदक, आंतरिक सेवा पदक तसेच पोलिस महासंचालकांचे मानाचे सन्मानचिन्ह मिळाले आहे.

विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने पिंपरी–चिंचवड पोलिस दलाचा गौरव वाढला असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Share This Article
Leave a comment