इंडियन डेंटल असोसिएशन (पिंपरी-चिंचवड) अध्यक्षपदी डॉ. विनायक कुमार शेट्टी यांची निवड

Pccnews

PCC NEWS
2 Min Read

इंडियन डेंटल असोसिएशन (पिंपरी-चिंचवड) अध्यक्षपदी डॉ. विनायक कुमार शेट्टी यांची निवड

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील नामांकित इंडियन डेंटल असोसिएशन (पिंपरी-चिंचवड) पुणे शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल नियोवूड्स, वाल्हेकरवाडी येथे ११ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडली. या सभेत इ.स. २०२६ या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

या निवड प्रक्रियेत डॉ. विनायक कुमार शेट्टी यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तसेच डॉ. गौरव विसपुते यांची सचिवपदी तर डॉ. दिपाली पाटेकर यांची खजिनदारपदी निवड झाली. सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून स्वागत केले.

डॉ. विनायक कुमार शेट्टी यांचा परिचय

डॉ. विनायक (विनय) कुमार शेट्टी मूळचे केंजूर, तालुका उडपी, कर्नाटक येथील सुशिक्षित कुटुंबातून असून ते श्री. व सौ. केंजूर भास्कर शेट्टी आणि विनोदा शेट्टी यांचे सुपुत्र आहेत.

त्यांनी आपले दंतवैद्यकीय शिक्षण के.व्ही.जी. डेंटल कॉलेज, मंगळूर येथून पूर्ण केले. उच्च गुणवत्ता, रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकी या गुणांमुळे त्यांची ओळख दंतवैद्यकीय क्षेत्रात वेगळीच आहे.

२३ वर्षांची उल्लेखनीय सेवा

सन २००२ पासून पिंपरी-चिंचवड येथील नामांकित वाय.सी.एम. सरकारी रुग्णालयात त्यांनी आपल्या दंतवैद्यकीय सेवेला सुरुवात केली. तेव्हापासून गेले २३ वर्षे ते सातत्याने पिंपरी-चिंचवड परिसरात रुग्णसेवा, दंत आरोग्य जनजागृती तसेच सामाजिक उपक्रमांत कार्यरत आहेत.

विविध दंत शिबिरे, आरोग्य जनजागृती मोहीमा आणि सामाजिक योगदानासाठी डॉ. शेट्टी यांची स्वतंत्र छाप निर्माण झाली आहे.

नव्या कार्यकारिणीकडून दंत आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदलांची अपेक्षा

नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवडमधील दंत आरोग्य सुविधा, व्यावसायिक विकास, तसेच सामाजिक दंत आरोग्य जनजागृती उपक्रमांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment