कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य मेळावा व रॅली संपन्न.

Shrikant Gadhave
2 Min Read
कामगार दिन

कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य मेळावा व रॅली संपन्न.

कामगार ,श्रमिकांची पिळवणूक व आर्थिक शोषण थांबावे– कामगारनेते यशवंतभाऊ भोसले.

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज हॉल येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तुकाराम नगर येथून निघालेल्या बाईक रॅलीचा समारोप पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. तसेच कामगार नगर व संत तुकाराम नगर परिसरात पायी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये भोसरी, चाकण, आळंदी, पिंपरी,चिंचवड, सणसवाडी,शिक्रापूर एमआयडीसी परिसरातील हजारो कामगार व नागरिक सहभागी झाले होते.

 

या कार्यक्रमाला साम टीव्ही चे पत्रकार गोपाळ मोटघरे,पीटीआय चे पत्रकार झैद मेमन, अल्फा लावल चे राहुल लांडगे, कैलास वाहन कंपनीचे बाळासाहेब गावडे, संभाजी विरकर, रमेश वाहिले, शंकर गावडे, राजू पवार, ईश्वर यादव, अमोल घोरपडे, राजू आरणकल्ले, अर्ष जागीरदार तसेच वाय सी एम हॉस्पिटलचे सर्व महिला कर्मचारी उपस्थीत होते.

यावेळी भोसले म्हणाले की,खाजगी कंपन्यांमध्ये शासनाच्या विविध खात्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यामध्ये तरुणांना कायद्यानुसार कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याऐवजी कंत्राटी कामगार कायद्याचा दुरुपयोग करून सर्रास श्रमिक तरुणांची आर्थिक व शारीरिक पीळवणूक करून आर्थिक दृष्ट्या देश कमकुवत होत आहे. श्रीमंत आणि गरीब यामध्ये खूप मोठी दरी वाढत चालली आहे.

ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार श्रमिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. सरकारने ज्यांनी उभी हयात श्रमिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य घालवले आहे अशा त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन श्रमिकांच्या व शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे बनवले व त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या संरक्षण दिले तर समाजातील संतुलन टिकणार आहे.

सरकारी अधिकारी न्याय देत नाहीत,न्यायालयामध्ये न्याय मिळण्यास विलंब लागतो, राजाश्रय मिळालेले ठेकेदार या सर्व साखळीमध्ये श्रमिक व शेतकरी जखडला गेला आहे.

भांडवलदाराच्या आणि ठेकेदाराच्या दबावाखाली कामगार व शेतकरी विरोधी धोरण तयार होत असेल तर सरकारवर श्रमिक व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी गांधीजींच्या मार्गाने आंदोलन उभे केले पाहिजे आणि ही चळवळ पिंपरी चिंचवड वरून सुरू करण्याचा निर्धार भोसले यांनी व्यक्त केला.

कामगार दिन
कामगार दिन

Share This Article
Leave a comment