पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्य, इतिहास आणि सामाजिक कार्याचा संगम; संभाजी बारणे यांच्या कार्याचे महापौरांकडून कौतुक

PCC NEWS
2 Min Read
Pccnews Reporter Yunus Khatib

पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्य, इतिहास आणि सामाजिक कार्याचा संगम; संभाजी बारणे यांच्या कार्याचे महापौरांकडून कौतुक

थेरगावचा इतिहास ते शिवचरित्र संकलन; बारणे यांची उल्लेखनीय वाटचाल

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) थेरगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, कवी व लेखक संभाजी बाळासाहेब बारणे यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवी लांडगे यांची भेट घेत शहराच्या वैभवावर आधारित आपल्या कवितासंग्रहाचे पुस्तक त्यांना भेट दिले. शहराच्या संस्कृती, विकास आणि ओळख यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या या कवितासंग्रहाचे महापौरांनी मनापासून कौतुक केले.

यावेळी संभाजी बारणे यांनी सध्या सुरू असलेल्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ५५१ शिवचरित्रांचे संकलन पूर्ण केल्याचे सांगितले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत महापौर रवी लांडगे यांनी बारणे यांच्या जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि सांस्कृतिक बांधिलकीचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संभाजी बारणे हे केवळ कवी नसून एक संशोधक वृत्तीचे लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी ‘थेरगावचा इतिहास’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक लिहून स्थानिक इतिहासाला उजाळा दिला आहे. याशिवाय विविध वस्तूंचे संकलन हा त्यांचा विशेष छंद असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींच्या व्हिजिटिंग कार्डचे केलेले संकलन ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदले गेले आहे. आता शिवचरित्र संकलनालाही अशीच मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचीही बारणे यांनी भेट घेतली. त्यांना कवितासंग्रह व ‘थेरगावचा इतिहास’ या पुस्तकांच्या प्रती भेट देण्यात आल्या. या पुस्तकातील ऐतिहासिक संदर्भांमध्ये शितोळे कुटुंबाच्या योगदानाचा उल्लेख असल्याची माहिती बारणे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर प्रशांत शितोळे यांनीही बारणे यांच्या संशोधनपर कार्याचे कौतुक केले.

‘थेरगावचा इतिहास’ या पुस्तकात बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत शितोळे यांच्याकडे कारभाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती, तसेच थेरगाव, पिंपळे सौदागर परिसरातील शेतसारा व्यवस्थापनात स्थानिक कुटुंबांची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक नोंदींमुळे स्थानिक वारसा आणि सामाजिक रचनेचे महत्त्व अधोरेखित होते.

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रात सक्रिय असलेले संभाजी बाळासाहेब बारणे यांचे कार्य पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद असल्याचे महापौर रवी लांडगे व पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी नमूद केले. आगामी काळात शिवचरित्र संकलनाच्या माध्यमातून इतिहासाची जपणूक आणि प्रेरणादायी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे बारणे यांचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment