थेरगावच्या संभाजी बारणे यांचा शिवचरित्र पुस्तकांचा विक्रमी संग्रह

PCC NEWS
3 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब

थेरगावच्या संभाजी बारणे यांचा शिवचरित्र पुस्तकांचा विक्रमी संग्रह

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित तब्बल ५०१ पुस्तकांचे संकलन

पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात वास्तव्यास असलेले सर्वपरिचित सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, राजकीय नेते व संस्थाचालक संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ५०१ शिवचरित्र पुस्तकांचे संकलन करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शिवाजी महाराजांवर आधारित एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचे संकलन ही कामगिरी ‘रेकॉर्ड ब्रेक’ मानली जात आहे.

संभाजी बारणे हे थेरगाव परिसरातील प्रभावी आणि सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्य करत असतानाच त्यांनी आपल्या छंदाला जपले असून विविध वस्तूंच्या संकलनासाठी त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार व गौरव प्राप्त झाले आहेत.

यापूर्वी सन २०१९ मध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व नगरसदस्यांच्या व्हिजिटिंग कार्ड्सचे संकलन करून विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे भव्य संकलन करत त्यांनी पुन्हा एकदा शहराचे लक्ष वेधून घेतले आहे.

शिवाजी महाराजांवर आधारित शंभर-दोनशे नव्हे, तर हजारोंच्या संख्येने ग्रंथ एकत्र आणणे ही बाब अत्यंत दुर्मिळ असून संभाजी बारणेंची ही कामगिरी इतिहास, वाचनसंस्कृती आणि शिवविचारांचे जतन करणारी ठरते.

संभाजी बारणे हे थेरगावमधील एक प्रभावी व सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व त्यांनी आपला वैचारिक छंद जपला आहे. इतिहासाविषयीची आस्था, संशोधनवृत्ती आणि जतनाची मानसिकता यातूनच हा भव्य संग्रह साकार झाला आहे.

या संग्रहामध्ये शिवाजी महाराजांचे बालपण, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, विविध लढाया, आग्र्याहून सुटका, तसेच किल्ल्यांवरील मोहिमा यांसह शिवकालीन इतिहासावर आधारित असंख्य ग्रंथांचा समावेश आहे. याशिवाय शिवकालीन नाणींचेही संकलन आपण करीत असल्याची माहिती संभाजी बारणे यांनी दिली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या पुस्तकांमध्ये प्रसिद्ध लेखक निनाद बेडेकर, नामदेवराव जाधव, सेतू माधवराव पगडी, इस्माईल पठाण, राजपाध्ये अंजली, वैद्य ची.वी. यासारख्या अनेकांचे पुस्तक संभाजी बारणे यांच्याकडे संकलित आहेत , या संकलनात डॉक्टर रवींद्र ठिपसे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले असल्याची माहिती संभाजी बारणे यांनी दिली आहे.

केवळ पुस्तकेच नव्हे, शिवकालीन नाण्यांचाही संग्रह

संभाजी बारणे यांनी माहिती देताना सांगितले की, “हा संग्रह केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नाही. शिवकालीन नाणी, ऐतिहासिक वस्तू यांचेही मी संकलन करीत असून हा ठेवा भविष्यात अभ्यासक व तरुण पिढीसाठी खुला करण्याचा मानस आहे.”

वाचनसंस्कृतीसाठी प्रेरणादायी उपक्रम

आपल्या प्रतिक्रियेत संभाजी बारणे म्हणाले,
“छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ इतिहास नाही, तर आजच्या काळासाठी मार्गदर्शक आहे. प्रत्येकाने शिवचरित्र वाचावे, विचार आत्मसात करावेत आणि आचरणात आणावेत, हाच माझ्या या संग्रहामागचा उद्देश आहे.”

त्यांच्या या इतिहासप्रेमी, वैचारिक व प्रेरणादायी उपक्रमामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचा नावलौकिक वाढला असून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. इतिहास जपण्याची आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही चळवळ ठरावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment