अंकुश चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती व गतिरोधक बसविण्याची मागणी

PCC NEWS
1 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजReporter Yunus Khatib

अंकुश चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती व गतिरोधक बसविण्याची मागणी

निगडी, दि. ११ (प्रतिनिधी): निगडी येथील सेक्टर नंबर २२ मधील अंकुश चौक परिसरात वाहतूक कोंडी, वेगवान वाहने व अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी तसेच आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मनसेच्या निगडी विभाग शाखेचे अध्यक्ष कु. सागर अनिल बहुले यांनी यासंदर्भात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंकुश चौक व त्यालगतच्या रस्त्यांवर सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असून विशेषतः सायकलथॉन व इतर स्पर्धांच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत होते. वेगवान वाहने, दुचाकींची बेदरकार चाल आणि गतिरोधकांचा अभाव यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

या चौकात नागरिकांची वर्दळ मोठी असून शाळा, वसाहती व मुख्य रस्त्यांच्या जोडण्या असल्याने वाहतूक नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वीही वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे तत्काळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करून नियमांची अंमलबजावणी करावी आणि गरजेनुसार गतिरोधक बसवून अपघात टाळावेत, अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आल्यास भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment