बास्केटबॉल खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू; तोलानी इन्स्टिट्यूटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Share
2 Min Read
Pimpri Chinchwad city newsReporter Yunus Khatib
SHARE
बास्केटबॉल खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू; तोलानी इन्स्टिट्यूटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब तळेगाव दाभाडे (इंदुरी) : मावळ तालुक्यातील इंदुरी येथील तोलानी मरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत बास्केटबॉल खेळताना एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित इन्स्टिट्यूट प्रशासनावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येत आहे.
रविवार, दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये बास्केटबॉल खेळ सुरू असताना विशाल वर्मा या विद्यार्थ्याच्या डोक्यावर अचानक बास्केटबॉलचा लोखंडी खांब कोसळला. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर शिवसेना युवासेना (मावळ तालुका व पिंपरी-चिंचवड शहर) यांच्या वतीने तत्काळ इन्स्टिट्यूटला भेट देण्यात आली. संबंधित प्रकार हा केवळ अपघात नसून इन्स्टिट्यूट प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप करत, प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
यासंदर्भात पोलिस प्रशासनाला निवेदन देत, संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, युवासेना विस्तारक निलेशजी बडदे निखिल दळवी यांच्यासह मावळ तालुका व पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.