पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ दिमाखात; मराठी संवर्धनासाठी तरुणांवर विशेष भर

PCC NEWS
2 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजReporter Yunus Khatib

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ दिमाखात; मराठी संवर्धनासाठी तरुणांवर विशेष भर

पिंपरी-चिंचवड | ०४ एप्रिल २०२६ कला, साहित्य आणि संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळालेला ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘कलारंग’ सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्यासह कार्यकारिणीतील अनेक सदस्यांचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. आपल्या भाषणात त्यांनी साहित्य परिषदेने भारतीय सांस्कृतिक विचारांचा व्यापक प्रवाह अधिक बळकट करावा, असे सांगत नव्या कार्यकारिणीला सक्रिय कामासाठी प्रेरित केले. साहित्यातून भारतीय अस्मिता आणि मूल्यांचा जागर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक क्षमतेचा उल्लेख करत १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शहरात आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. साहित्यिकांचा गौरव हा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमामुळे शहराच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

अध्यक्ष योगेश सोमण यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या ११९ वर्षांच्या परंपरेचा उल्लेख करत पुढील वाटचालीचे दिशादर्शन केले. मराठी भाषेचे जतन आणि प्रसार ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः तरुण पिढीला साहित्याशी पुन्हा जोडण्यासाठी ठोस उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘अभिवाचन’सारख्या कार्यशाळांद्वारे वाचन संस्कृतीला चालना देण्याचा मानस त्यांनी मांडला.

तसेच साहित्य क्षेत्रातील महिलांचे कमी प्रतिनिधित्व ही चिंतेची बाब असल्याचे नमूद करत भविष्यात अधिक समावेशकता आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पुढील पाच वर्षांसाठी सर्वसमावेशक नियोजन करून साहित्य परिषद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन ‘कलारंग’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. निवेदन रविंद्र खरे यांनी केले. शेवटी संयोगिता खुडे यांनी ‘पसायदान’ सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.

हा सोहळा म्हणजे कला, साहित्य आणि संस्कृतीचा सुंदर मिलाफ ठरला असून उपस्थित रसिकांनी त्याचा मनापासून आनंद घेतला.

TAGGED:
Share This Article
Leave a comment