पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास शासनाची मंजुरी

PCC NEWS
3 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास शासनाची मंजुरी

AI-आधारित शहरव्यापी निगराणीमुळे गुन्हे नियंत्रण व सार्वजनिक सुरक्षा अधिक बळकट होणार

पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, वाहतूक व्यवस्थापन व सार्वजनिक सुरक्षेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी प्रस्तावित अत्याधुनिक एकात्मिक सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या उच्चस्तरीय समितीने (HPC) मान्यता दिली आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास हिरवा कंदील दिला आहे.

वेगाने औद्योगिक व नागरी विकास होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाढती लोकसंख्या, वाहतूक, औद्योगिक हालचाली तसेच सण-उत्सव व धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक होता. त्याच अनुषंगाने हा शहरव्यापी सीसीटीव्ही निगराणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

अलिकडच्या काळात पिंपरी-चिंचवड पोलिस दलाने पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देत सहा नवीन पोलिस ठाण्यांची स्थापना, दहा सहाय्यक पोलिस आयुक्त, पाच पोलिस उप-आयुक्त व एका अतिरिक्त पोलिस आयुक्त पदाची निर्मिती करून सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यासोबतच नवीन पोलिस आयुक्तालय इमारत, पोलिस ठाण्यांच्या इमारती, प्रशस्त परेड मैदान, सुसज्ज मोटार परिवहन विभाग व विविध कार्यालयांसाठी आवश्यक जमीन संपादन करण्यात आले आहे.

या पायाभूत विकासासोबतच मंजूर झालेला सीसीटीव्ही प्रकल्प संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात एकात्मिक व केंद्रीकृत निगराणी व्यवस्था उभारणार आहे. या प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी मिशन व महापालिकेमार्फत आधीपासून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे एकत्रित करण्यात येणार असून, ज्या ठिकाणी अद्याप कव्हरेज नाही अशा महत्त्वाच्या भागांमध्ये नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

चाकण, तळेगाव व भोसरी एमआयडीसीसह हिंजवडी आयटी हबमध्ये विशेष निगराणी ठेवण्यात येणार आहे. तसेच देहू व आळंदी या धार्मिक तीर्थक्षेत्रांमध्ये सण-उत्सव व पालखी सोहळ्याच्या काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी मजबूत सीसीटीव्ही जाळे उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पात एआय-आधारित प्रगत व्हिडिओ अ‍ॅनालिटिक्सचा वापर करण्यात येणार असून, त्यामुळे गुन्हे शोध व तपास, वाहतूक नियमांची अंमलबजावणी, गर्दी नियंत्रण व आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे. नव्या पोलिस आयुक्तालयात अत्याधुनिक एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यात येणार असून, येथील थेट दृश्ये सर्व परिमंडळ पोलिस उप-आयुक्त, वाहतूक विभाग व पोलिस ठाण्यांना उपलब्ध राहणार आहेत.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती (PIC) स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये महापालिका, पीएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमआयडीसी व पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली राबविण्यात येणारा हा सीसीटीव्ही प्रकल्प नागरिकांच्या सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ करणार असून, सुरक्षित व स्मार्ट पिंपरी-चिंचवड शहर घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment