साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व दिमाखात साजरा होणार.

PCC NEWS

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व दिमाखात साजरा होणार.

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट.

पिंपरी, दि. ७ – पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व साजरा करण्याच्या अनुषंगाने भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शहरातील सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची शनिवारी भेट घेतली. विचार प्रबोधन पर्वच्या नियोजनाबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने बैठक घ्यावी आणि निधीमध्ये वाढ करावी, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात दिमाखात साजरी करण्यात यावी, त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेने कुठेही कमी पडू नये, अशा मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या. आयुक्तांनी सकल मातंग समाज शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या या भेटीत मान्य केल्याने यंदाचा जयंती उत्सव सोहळा दिमाखात साजरा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत निगडीसह शहराच्या इतर भागात विविध समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२४ चे आयोजन केले जात असताना त्यासंदर्भात शहरातील सकल मातंग समाजाच्या वतीने काही मागण्या पुढे आल्या आहेत.

त्यानुसार या समाजाच्या शिष्टमंडळाने भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन घोलप, माजी अध्यक्ष नाना कसबे, सुनील भिसे, संजय ससाणे, अरूण जोगदंड, बाळासाहेब पाटोळे, रामेश्वर बावणे, नाना कांबळे, मोहन भिसे आदी उपस्थित होते.

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२४ संदर्भात महापालिका प्रशासनाने शहरातील सकल मातंग समाजाला व या समाजातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन नियोजन करावे, नियोजनाची बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी, विचार प्रबोधन पर्वसाठीच्या निधीमध्ये तातडीने वाढ करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेने कुठेही कमी पडू नये तसेच इतर राष्ट्र पुरूषांप्रमाणेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात दिमाखात साजरी करण्यात यावी, अशा मागण्या भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केल्या.

आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी व्हावी, यासह सर्व मागण्या मान्य केल्याने सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने या भेटीत समाधान व्यक्त केले. तसेच या मागण्यांसाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेतल्याबद्दल सकल मातंग समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment