पुणे : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चंदन चोरीच्या घटना वाढल्या असून, चंदनाच्या अनेक झाडांची चोरी झाली आहे. यातील बहुतांश झाडे महत्त्वाच्या संस्था, कंपन्यांच्या आवारातील असल्याने या परिसरातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खडकी अॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातील मुळा हाऊस येथे सुरक्षा रक्षकाला करवतीचा धाक दाखवून चंदनाचे झाड चोरुन नले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत अनिल भगवान भागवत (रा. निम्हन आळी, पाषाण, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अशोक भिमाजी गांगड, राजेंद्र रामदास डोके ( दोघे रा. मु.पो. आंबेगव्हान, ता. जुन्नर) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या इतर अनोळखी साथीदारावर आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार मंगळवारी (दि.12) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुळा हाऊस येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अॅम्युनिशन फॅक्टरी परिसरातील मुळा हाऊस येथे सुरक्षा रक्षक आहेत. मंगळवारी पहाटे आरोपींनी त्यांच्या हातातील करवतीचा धाक फिर्य़ादी यांना दाखवला. यानंतर त्यांच्या खिशातील 450 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तसेच इतर दोन आरोपींनी त्याठिकाणी असलेले चंदनाचे झाड कापुन घेऊन गेले. याबाबत भागवत यांनी खडकी पोलिसांना माहिती दिली.