सिंग इज किंग’ चौक नामकरणाचा प्रस्ताव — माधव पाटलांची आयुक्तांकडे मागणी!
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पिंपरी चिंचवड शहराचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी नव्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांना एक वेगळ्याच धाटणीचं पत्र दिलं आहे. माजी आयुक्त आयएएस शेखर सिंह यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत त्यांनी फिनोलेक्स चौकातील लाल घोडा हटवून तिथे सिंह यांचा पुतळा बसवावा आणि त्या चौकाचे नाव “आयएएस शेखर सिंह – किंग सिंग इज किंग चौक” असे ठेवावे, अशी मागणी केली आहे.
माधव पाटील यांनी त्यांच्या पत्रात उपरोधात्मक शैलीत लिहिले आहे की,
“गेल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत शेखर सिंह यांनी ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळातील निर्णय हा पीएचडी चा विषय ठरेल.”
पाटील यांनी नमूद केले की, शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेवर वीस हजार कोटींचं कर्ज केलं असलं तरी “विकास (भाजपचा) करायचा म्हटलं की कर्ज हे होणारच” असा टोमणाही त्यांनी मारला.
त्याचबरोबर शहरातील मूलभूत सुविधा, पाणीटंचाई, भिक्षेकरी आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, तसेच चिखलीतील व्यवसायिकांवर झालेली बुलडोझर कारवाई या सर्व विषयांवरही त्यांनी शेखर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
पत्राच्या शेवटी त्यांनी उपरोधाने म्हटलं आहे की,
“सामान्य जनता बेहद खुश आहे सिंग इज किंग यांच्यावर! त्यामुळे चौकाचं नामकरण करून प्रेरणा मिळेल — भारतातील ६८७७ आयएएस अधिकाऱ्यांना.”
या उपरोधिक पत्रामुळे शहराच्या प्रशासकीय वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे.