आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड दिनांक :०७ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक १४ मधील शिवसेनेचे उमेदवार निखील उमाकांत दळवी यांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, प्रभाग क्रमांक १४ अंतर्गत दत्तवाडी विठ्ठलवाडी, विवेकनगर, काळभोरनगर, मोहनगर, चिंचवड स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यांचे प्रचार फलक व बोर्ड महापालिकेच्या खांबांवर लावण्यात आले आहेत.
निवडणूक आचारसंहिता सुरू असताना अशा प्रकारे बेकायदेशीर प्रचार साहित्य लावणे हा नियमांचा स्पष्ट भंग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून संबंधित उमेदवारावर तात्काळ कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निखील उमाकांत दळवी यांनी केली आहे.
ही तक्रार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.५५ वाजता दाखल करण्यात आली आहे.
निवडणूक प्रशासन या तक्रारीची दखल घेणार का आणि संबंधित उमेदवारावर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले आहे.

