पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ उद्या सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ शहरातील ८ ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया — आयुक्त श्रावण हर्डीकर

PCC NEWS
4 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ उद्या सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ शहरातील ८ ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी, दि. १५ जानेवारी २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी उद्या शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता सुरू होणार असून, शहरातील निश्चित केलेल्या एकूण ८ ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक विभागाकडून ओळखपत्र देण्यात आलेल्या अधिकृत व पात्र व्यक्तींनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व अचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

विविध प्रभागांसाठी मतमोजणी केंद्रे व फेऱ्या

प्रभाग क्रमांक १०, १४, १५ व १९ येथील मतमोजणी स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, प्राधिकरण, सेक्टर क्र. २६, निगडी येथे होणार असून, प्रभाग १० साठी १७ फेऱ्या, प्रभाग १४ व १९ साठी प्रत्येकी १८ फेऱ्या तर प्रभाग १५ साठी १५ फेऱ्या होणार आहेत.

प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २२ येथील मतमोजणी ऑटो क्लस्टर येथील छोटा हॉल, चिंचवड येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग १६ व २२ साठी प्रत्येकी १४ फेऱ्या, तर प्रभाग १७ व १८ साठी प्रत्येकी १६ फेऱ्या घेण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक ०२, ०६, ०८ व ०९ येथील मतमोजणी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे होणार असून, प्रभाग २ साठी २१, प्रभाग ६ साठी १७, प्रभाग ८ साठी २० आणि प्रभाग ९ साठी १८ फेऱ्या होतील.

प्रभाग क्रमांक २५, २६, २८ व २९ येथील मतमोजणी ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणी येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग २५ व २९ साठी प्रत्येकी २० फेऱ्या, तर प्रभाग २६ व २८ साठी प्रत्येकी २१ फेऱ्या होणार आहेत.

प्रभाग क्रमांक ०३, ०४, ०५ व ०७ येथील स्ट्राँग रूम कबड्डी प्रशिक्षण संकुलच्या तळमजल्यावर असून, मतमोजणी पहिल्या मजल्यावर, अंकुशराव लांडगे नाट्यगृहामागे, भोसरी येथे होणार आहे. प्रभाग ३ साठी १८ फेऱ्या, तर प्रभाग ४, ५ व ७ साठी प्रत्येकी १६ फेऱ्या होतील.

प्रभाग क्रमांक १, ११, १२ व १३ येथील मतमोजणी सेक्टर १७/१९, स्पाईन रोड शेजारी, सी-१ इमारतीसमोर, घरकुल चिखली टाऊनहॉल, चिखली येथे होणार असून, प्रभाग १ साठी १७, प्रभाग ११ साठी १६, प्रभाग १२ साठी १४ आणि प्रभाग १३ साठी १५ फेऱ्या घेण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक २१, २३, २४ व २७ येथील मतमोजणी स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग २१ साठी १७, प्रभाग २३ साठी १०, प्रभाग २४ साठी १४ आणि प्रभाग २७ साठी १६ फेऱ्या होतील.

प्रभाग क्रमांक २०, ३०, ३१ व ३२ येथील मतमोजणी मनपाच्या कासारवाडी भाजी मंडई (दुमजली हॉल) येथे होणार असून, तळमजल्यावर मतमोजणी व दुसऱ्या मजल्यावर स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग २० साठी २०, प्रभाग ३० साठी १६, प्रभाग ३१ साठी १९ तर प्रभाग ३२ साठी १७ फेऱ्या होणार आहेत.

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण शहराचे लक्ष उद्याच्या निकालाकडे लागले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment