ते आले, लुटले आणि कुंभमेळ्याला गेले — माधव पाटील यांची आयुक्त शेखर सिंह यांच्यावर सडकून टीका.
पिंपरी चिंचवड, दि. ८ ऑक्टोबर (pccnews) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नुकतीच नाशिक महाकुंभमेळ्याच्या आयुक्तपदी बदली झाली असून, त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळावर आता राजकीय टीका सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ते माधव पाटील यांनी समाजमाध्यमांवरून सिंह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत “ते आले, लुटले आणि कुंभमेळ्याला गेले” अशी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील यांनी म्हटले की, “गेल्या तीन वर्षांत काही लोकप्रतिनिधींची मर्जी राखत पिंपरी चिंचवडकरांच्या कराची अमाप लूट करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या विविध कारभारांद्वारे सुमारे ५००० कोटी रुपये शहरातून उकळले गेले. आता हेच आयुक्त कुंभमेळ्यात जाऊन पाप धुणार आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, “कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात, नदीतील जलपर्णी साफसफाईत आणि हरित प्रकल्पांत प्रचंड भ्रष्टाचार झाला. पाच कोटींच्या IT प्रकल्पाचे कंत्राट तब्बल १५० कोटींना देण्यात आले, तर फक्त १.२५ किलोमीटर रस्त्यासाठी आठ कोटी खर्च करण्यात आले. चिखली परिसरातील अनेक उद्योगांवर बुलडोझर फिरवून उद्योजकांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. तसेच २०० कोटींचे हरित बाँड म्हणजे भीकबाँड काढून हरित कंत्राटदारांसाठी ‘भीक मागितली’.”
पाटील यांनी पुढे आशा व्यक्त केली की, “नवीन येणारे आयुक्त हे कोणाच्याही हातातील बाहुले न ठरता खर्या अर्थाने शहरविकासासाठी काम करतील, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.”