गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स, पुणे यांच्या वतीने “Read to Lead” कार्यक्रम उत्साहात संपन्न

PCC NEWS
2 Min Read

गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स, पुणे यांच्या वतीने “Read to Lead” कार्यक्रम उत्साहात संपन्न

“Entrepreneur’s Bookmark – Every Page Builds a Leader” या प्रेरणादायी उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड दिनांक : 13 नोव्हेंबर 2025 (विशेष प्रतिनिधी युनूस खतीब 9420554065) स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स, पुणे यांच्या वतीने “Entrepreneur’s Bookmark – Every Page Builds a Leader” हा प्रेरणादायी कार्यक्रम भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात अत्यंत उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित या उपक्रमात उद्योजकता, वाचन संस्कार आणि सामाजिक जाण यांचा समन्वय पाहायला मिळाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. विनायक भोंगाळे (संस्थापक व अध्यक्ष) उपस्थित होते, तर मा. दिनेश ताठे (संचालक, Mindmappers Career Counselling, पुणे) यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि पालकांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालिका सौ. कविता कडू पाटील यांनी स्वागतपर भाषण करत “Read to Lead” या उपक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य आणि नाट्यप्रयोगांद्वारे वाचन, ज्ञान आणि नेतृत्वाचे महत्व प्रभावीपणे मांडले.

सातवीच्या विद्यार्थ्यांनी “स्वतःची किंमत मार्केटमध्ये कशी वाढवायची” या विषयावर केलेले सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले. तसेच विद्यार्थ्यांनी बँक कर्ज प्रक्रिया, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट, ट्रेडिंग, आर्थिक साक्षरता यांसारख्या व्यावहारिक विषयांवरील माहिती सादर केली.

“विश्वास सबसे बडा” हे चऱ्होली शाखेच्या विद्यार्थ्यांचे नाटक प्रेक्षकांच्या मनाला भिडले. शिक्षकांनी सादर केलेल्या “कान मुरगळण्यामागचे फायदे” या हलक्याफुलक्या नाटकाने उपस्थितांचे मन रिझवले.

दिनेश ताठे सरांनी मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. विनायकराव भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालिका सौ. कविता कडू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत, विपणन अधिकारी श्री. शैलेंद्र सिंग, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकांनी “Read to Lead” या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सचे मनःपूर्वक आभार मानले आणि हा उपक्रम भावी पिढीला “नोकरी मागणारी नव्हे, नोकरी देणारी” बनवेल असा विश्वास व्यक्त केला.

TAGGED:
Share This Article
Leave a comment