मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो- उपमुख्यमंत्री अजित पवार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशीम मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित सुमारे २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ केला. पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटनही त्यांनी केले, “आमच्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात आणि विकासाच्या प्रवासात मोठी भूमिका बजावली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमात सहभागी झाले होते.मुंबई मेट्रो लाइन-3 च्या बीकेसी ते आरे जेव्हीएलआर सेक्शनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
बंजारा समाजाचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन या संग्रहालयात होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर संजय राठोड यांनी पुढाकार घेतला आणि अतिरिक्त १०० कोटी रुपये प्रदान करण्यात आले. या प्रकल्पाचे सध्याचे मूल्य ७०० कोटी रुपये आहे. “आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की महायुती सरकार आपल्या कल्याणासाठी काम करत राहील.”उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारच्या बंजारा समाजाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.