निगडीतील अवैध धंद्यांविरोधात मेहबूब शेख यांचे आमरण उपोषण

PCC NEWS
2 Min Read

निगडीतील अवैध धंद्यांविरोधात मेहबूब शेख यांचे आमरण उपोषण

२५ ऑक्टोबरपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन सुरू होणार

पुणे, २४ ऑक्टोबर २०२५ (प्रतिनिधी) निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत चाललेल्या अवैध धंद्यांविरोधात आणि पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात समाजसेवक मेहबूब लियाकत शेख यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.

हे उपोषण दिनांक : २५ ऑक्टोबरपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर सुरू होणार असून, अवैध धंद्यांवर ठोस कारवाई होईपर्यंत सुरू राहणार आहे.

शेख यांनी सांगितले की, निगडी परिसरात अनेक ठिकाणी अवैध स्पा सेंटरमध्ये अनैतिक कृत्ये, अवैध दारू विक्री, गुटखा-तंबाखूचा व्यापार, गांजा आणि नशेच्या पदार्थांची विक्री सुरू असून, काही ठिकाणी हातभट्टी दारूचे उत्पादनही होत आहे. या सर्व गोष्टी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१, प्रोहिबिशन कायदा १९४९, COTPA २००३, NDPS कायदा १९८५ आणि उत्पादन शुल्क कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.

या अवैध व्यवसायांमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिला आणि लहान मुले, त्रस्त झाले आहेत. परिसरातील गुन्हेगारी वाढली असून, तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.

शेख यांनी आधीच विविध माध्यमांतून आणि ई-मेलद्वारे तक्रारी नोंदवल्या असूनही निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे अवैध धंदे फोफावत आहेत, म्हणूनच मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. हे उपोषण शांततामय व कायदेशीर मार्गाने होईल,” असे शेख म्हणाले.

त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेतः

निगडीतील अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर चौकशी करून कारवाईचा अहवाल मागवावा.

संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी.

माध्यमांनी या विषयावर जनजागृती करावी.

मेहबूब शेख यांनी सांगितले की, त्यांच्या कडे या अवैध धंद्यांचे फोटो, व्हिडिओ आणि साक्षीदारांची यादी असून, ती आवश्यकतेनुसार प्रशासनाला सादर करण्यात येईल.

Share This Article
Leave a comment