पिंपरी चिंचवड दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) – शहरातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. तब्बल २००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ संभाजी जगताप यांनी १० ऑक्टोबरपासून अप्पर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
जगताप यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून अवैध उत्खननाच्या १०८ हून अधिक तक्रारी अप्पर तहसील कार्यालयाकडे दिल्या असूनही अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत.
त्यांनी अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, “बिल्डर आणि डेव्हलपर्स यांना नोटीस न पाठवता, तक्रारदारांना न विचारता एकतर्फी निर्णय देण्यात आले. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळाले.”
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा जगताप यांनी दिला आहे.