प्रभाग ९ मधून पत्रकार सागर सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

PCC NEWS
2 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब

प्रभाग ९ मधून पत्रकार सागर सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

लोकभावना लक्षात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात; शिवसेना (उबाठा) कडून अधिकृत उमेदवारी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून पत्रकार सागर सूर्यवंशी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खराळवाडी, गांधीनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा, यशवंतनगर आणि नेहरूनगर या भागांचा समावेश असलेल्या प्रभाग ९ साठी त्यांनी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. यावेळी प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिक व समर्थक उपस्थित होते.

पत्रकार सागर सूर्यवंशी हे दीर्घकाळ भारतीय जनता पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. मात्र, उमेदवारीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडून त्यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा प्रभागात आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातून निर्माण झालेली जनओळख आणि लोकसमर्थन लक्षात घेता, ऐनवेळी शिवसेना (उबाठा) पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे प्रभाग ९ च्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांशी सागर सूर्यवंशी यांचा घनिष्ठ जनसंपर्क असून, सुशिक्षित, युवा नेतृत्व, तसेच अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेणारा आवाज अशी त्यांची ओळख आहे. माध्यमांशी बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, “प्रभाग ९ मध्ये मागील काळात अपेक्षित विकासकामे झाली नाहीत. रस्त्यांची दुरवस्था, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त आहेत.”

स्थानिक रहिवाशांच्या मते, माजी नगरसेवक व प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. अनेक मंजूर कामे केवळ कागदावरच राहिल्याने विकासाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नवीन, कार्यक्षम आणि लोकाभिमुख उमेदवाराची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

“मी फक्त आश्वासन देणारा उमेदवार नाही, तर प्रत्यक्ष काम करणारा प्रतिनिधी म्हणून प्रभागातील प्रलंबित विकासकामांना गती देईन, पारदर्शक कारभार करीन आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देईन,” असा विश्वास सागर सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

प्रभाग ९ मधील या उमेदवारीमुळे निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment