पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औंध रुग्णालयात नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण; अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन.

PCC NEWS
2 Min Read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औंध रुग्णालयात नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण; अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन.

पुणे, दि.२५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औंध येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत नवीन ३० खाटांच्या आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि ‘पीएम-अभिम’अंतर्गत नवीन १०० खाटांच्या अतिदक्षता रुग्णालय (क्रिटिकल केअर) इमारतीचे दूरदृष्य प्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार अश्विनी जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदी उपस्थित होते.

औंध येथील ३० खाटांच्या आयुष रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत ८ कोटी ९९ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या रुग्णालयात तळमजल्यावर योगा, प्रतिक्षालय, अभिलेख, प्रक्रिया, मुख्य वैद्य कक्ष तसेच पी.जी.एम. आयुर्वेद कक्ष, स्वच्छता गृह, होमियोपॅथी कक्ष, युनानी, प्रयोगशाळा, मड बाथ नॅचेरोपॅथी, नॅचरोपॅथी आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच पंचकर्म, क्षारसूत्रा व इतर आयुष उपचार मोफत केले जाणार आहेत.

पहिल्या मजल्यावर गर्भसंस्कार कक्ष, बैठक सभागृह, विशेष कक्ष, स्वच्छता गृह, निर्जंतुकीकरण कक्ष, वैद्यकीय अधिकारी कक्ष, स्क्रब रुम, शस्त्रक्रिया गृह, रिकव्हरी रुम, शस्त्रक्रियापूर्व दक्षता कक्ष, पुरुष व महिला कक्ष, प्रतिक्षालय कक्ष, शुश्रुषा कक्ष अशा सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

‘पीएम-अभिम’ अंतर्गत औंध जिल्हा रुग्णालयात नवीन १०० खाटांच्या अतिदक्षता (क्रिटिकल केअर) रुग्णालयासाठी ४० कोटी ५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या रुग्णालयात तळमजल्यावर प्रतिक्षा, वैद्यकीय, मुख्य वैद्यकीय, तपासणी, भांडार, प्रयोगशाळा, नवजात शिशु, वेलनेस, प्रसाधन, तसेच पहिल्या मजल्यावर विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) वैद्यक आणि परिचारिका कक्ष, दुसऱ्या मजल्यावर ओटी कॉम्पलेक्स, एचडीयू, अतिदक्षता विभाग आणि इतर सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. यमपल्ले यांनी दिली आहे.

Update By Reporter yunus khatib 942055406

TAGGED:
Share This Article
Leave a comment