भाजपाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही, तोपर्यंत मावळच्या उमेदवाराचे काम करणार नाही; भाजप कार्यकर्त्यांचा बैठकीत नाराजीचा सुर.

PCC NEWS

भाजपाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही, तोपर्यंत मावळच्या उमेदवाराचे काम करणार नाही; भाजप कार्यकर्त्यांचा बैठकीत नाराजीचा सुर.

पिंपरी : मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार व सध्याचे उमेदवार यांनी मागील दोन टर्म भारतीय जनता पक्षाच्या जीवावर खासदार होऊन दहा वर्षाच्या कालावधीत भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला कोणतीही विचारणा केलेली नाही किंवा मदतही केली नाही, विश्वासात देखील घेतले नाही, अशा उमेदवाराला आम्ही मदत का करावी ? असा सवाल उपस्थित करत भाजपा कार्यकर्ते, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते, वॉरियर्स यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, भाजपा कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जात नाही, तो पर्यंत निवडणुकीत काम न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

रविवारी, दि. 31 रोजी पिंपरी चिंचवड भाजपा मध्यवर्ती कार्यालयात सर्व बूथ प्रमुख, वॉरियर्स, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी यांची आढावा बैठक पार पडली. यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी विद्यमान खासदार व मावळ लोकसभा उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्याबाबत नाराजीचा सूर व्यक्त केला. भाजपा प्रदेशाकडून याबाबत गंभीरतेने दखल घेवून शहराध्यक्षांना जोपर्यंत विश्वास दिला जात नाही. जोपर्यंत शहराध्यक्ष कार्यकर्त्यांना आदेश देत नाहीत, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मावळचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचे काम करणार नाही, असा एकत्रित सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडला. याप्रसंगी बूथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नाराजी मांडत राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी हा विषय गंभीरतेने घेऊन सर्व कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा, असे मत भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, सरचिटणीस नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे, उपाध्यक्ष बिभीषण चौधरी, माजी नगरसेवक सुरेश भोईर, संकेत चौंधे, रवींद्र प्रभुणे, कोमल शिंदे यांच्यासह सर्व बूथ प्रमुख, वॉरियर्स, मंडल अध्यक्ष, प्रदेश सदस्य, जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment