सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेजेस.

PCC NEWS

सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेजेस.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे (SSPU) आणि सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदोर (SUAS) या सिंबायोसिस स्किल्स विद्यापीठांचा ‘स्टार प्लेसमेंट अचिव्हर २०२४’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात दोन्ही विद्यापीठांतील सर्वोत्कृष्ट पगाराची नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठित कंपनीत वार्षिक ३२ लाख रुपयांचे पॅकेज मिळवणाऱ्या डेटा सायन्स स्कॉलर श्रीजा आर . तसेच ‘कॉम्पुटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये शिकत असलेल्या, वार्षिक २४ लाखांचे पॅकेज मिळवणाऱ्या श्रुती माखवान यांच्या यशाचे रहस्य उलगडले. विद्यार्थ्यांच्या देदीप्यमान कामगिरीमुळे सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. या मुलींच्या यशामुळे कौशल्य विद्यापीठांतील विद्यार्थी एमबीएच्या विद्यार्थ्यांसारख्याच उत्तम पगाराच्या नोकरीच्या संधी किंबहुना त्याहून अधिक चांगली पॅकेज मिळवू शकतात, हे सिद्ध झाले.

कौशल्य विद्यापीठे भविष्यातील उद्योगविश्वाच्या गरजा ओळखून, उद्योगांना पूरक ठरतील अशा डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, आओटी, न्युट्रिशन, इलेक्ट्रिकल व्हेइकल टेक्नॉलॉजी अशा नवनव्या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम राबवत असतात. कौशल्य विद्यापीठे निपुणता, उद्योगांना पूरक अभ्यासक्रम, अनुभवाधारित शिक्षण यावर भर देत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटमध्ये त्याचे चांगले परिणाम दिसून येतात आणि भविष्यात मोठ्या संधी असलेल्या क्षेत्रांच्या गरजा शिक्षणाच्या माध्यामातून पूर्ण करत ‘भविष्यवेधी विद्यापीठ’ म्हणून विद्यापीठे स्वतःचे स्थान मजबूत करत आहेत.

या कार्यक्रमात सायबर सिक्युरिटी क्षेत्राशी संबंधित अमेरिकास्थित एका मोठ्या कंपनीत २४ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळवणाऱ्या श्रुती माखवान हिने आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, ‘’विद्यापीठाच्या नेटवर्क सिक्युरिटी, क्लाऊड कम्प्युटिंग, आयओटी यासारख्या नव्या विषयांचा समावेश असलेल्या सखोल अभ्यासक्रमामुळे या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळाले. त्याचा मला फार उपयोग झाला.’’

तसेच, डेटा सायन्स शिकत असलेल्या श्रीजा एन हिला अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनीत डेटा आर्किटेक्ट म्हणून वार्षिक ३२ लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली आहे. तिच्या अनुभवाविषयी बोलताना ती म्हणाली,’’या विद्यापीठात तिला नेहमीच्या साचेबद्ध अध्यापनाऐवजी अनुभवाधारित अध्ययन पद्धतीची नव्याने ओळख झाली. डेटा सायन्स विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यशाळा आणि सेमिनार्समुळे मला मशिन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, क्लाऊड अशा विषयांतील नवनवी माहिती मिळत गेली. चौकटीबाहेरचा विचार समजून घेता आला.’’

उद्योगविश्वाच्या नेमक्या गरजा ओळखून त्याप्रमाणे अभ्यासक्रमाचे उत्कृष्ट मॉडेल बनवून विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देत, उद्योग व शैक्षणिक गुणवत्तेची सांगड विद्यापीठाने घातली आहे, याची सध्याच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या ह्या एक झलक आहे. त्याबरोबरच, सर्वच बॅचेसच्या पदवीधरांना १०० टक्के इंटर्नशिप मिळाली आहे. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या काळातच महिन्याला ३५ ते ४० हजार स्टायपेंड मिळू लागला आहे.

वर्षभराची इंटर्नशिप हा या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. याला कंपन्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. उद्योगक्षेत्रासारख्या उच्च दर्जाच्या कार्यक्षम सुविधांमुळे SSPUच्या ८३ टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच प्लेसमेंटच्या संधी मिळाल्या. SUAS च्या आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्या. जेएम फायनान्शिअल, मूडीज, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, फेडेक्स, सिन्क्रोनी, कल्याणी फोर्ज, वॉल स्ट्रीट फायनान्स, लॅक्मे सलॉन, ताज महाल पॅलेस हॉटेल, फियाट, मर्सिडिज बेंन्झ, गोदरेज इन्फोटेक, पालो अल्टो नेटवर्क यांसारख्या कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्या आहेत.

डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलपती , सिंबायोसिस स्किल युनिव्हर्सिटीज यांनी विद्यार्थ्यांची ही कामगिरी विद्यापीठासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, “या विद्यार्थ्यांचा सत्कार हा आमच्यासाठी विशेष दिवस आहे, कारण आम्ही कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेतून सुरु केलेल्या प्रयोगाला छोटे यश मिळाले आहे. उच्च पगार देणाऱ्या नोकरी मिळवणं ह्या द्वारे असे दिसते की कौशल्य विद्यापीठांमधून पदवीधर झालेले विद्यार्थी हे अनेक उद्योगांसाठी तयार मनुष्यबळ असतात जे आपल्याला पारंपरिक विद्यापीठांमधून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्याच्या स्पर्धेत मागे टाकतात. उच्च पगाराच्या प्लेसमेंटचे आणखी एक कारण म्हणजे आमचे अभ्यासक्रम हे उद्योगाच्या गरजांवर आधारित आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे आमच्याकडे शिक्षण पूर्ण केलेल्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना एमबीए पूर्ण केल्यानंतर मिळालेल्या पॅकेजपेक्षा जास्त पॅकेज मिळतात.”

हे आगळेवेगळे अध्यापनशास्त्र विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या क्षेत्रांतील नोकरींच्या संधींपुरते मर्यादित नाही तर त्या क्षेत्रात ‘नोकरी देणारे उद्योजक’ म्हणून उभे राहण्यास त्यांना तयार करते. कौशल्य विद्यापीठांतून शिक्षण पूर्ण झाल्यावर जवळपास २० टक्के विद्यार्थी उद्योजकतेकडे वळतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू करतात. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचा गौरव व्हावा, म्हणून दीक्षांत समारंभात सर्वोत्कृष्ट उद्योजक विद्यार्थ्याला आत्मनिर्भर पुरस्काराने सन्मानित केले जाते. .

TAGGED:
Share This Article
Leave a comment