श्री. विक्रांत बगाडे यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती
पिंपरी चिंचवड दिनांक: १४ डिसेंबर २०२५ (युनूस खतीब)पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर श्री. विक्रांत बगाडे यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने याबाबत दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी शासन आदेश जारी केला आहे.
सद्यस्थितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. विक्रांत बगाडे यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील रिक्त अतिरिक्त आयुक्त पदावर प्रारंभी दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिनियुक्तीचा कालावधी त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून लागू राहणार आहे.
शासन आदेशानुसार, लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यास प्रतिनियुक्तीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीही शासनास त्यांना मूळ विभागात परत बोलावून घेण्याचा अधिकार राहणार आहे. तसेच स्वीयेतर नियोक्त्याला त्यांच्या सेवा आवश्यक नसल्यास त्या परत करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय, श्री. बगाडे यांनी किमान तीन महिन्यांची लेखी सूचना दिल्यानंतर मूळ विभागाकडे परत जाण्याचा पर्यायही उपलब्ध राहणार आहे.
या नियुक्तीसाठी ग्राम विकास विभागाने श्री. विक्रांत बगाडे यांना कार्यमुक्त करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यमुक्त झाल्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत रुजू होऊन त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करणे अपेक्षित आहे.
ही प्रतिनियुक्ती महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील तरतुदींनुसार करण्यात आल्याचेही शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. श्री. विक्रांत बगाडे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.