बुधवारी “हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव” आंदोलन

PCC NEWS
2 Min Read
Pccnews.in

बुधवारी “हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव” आंदोलन

नागरिकांनी सहभागी व्हावे एनपीआरएफ फाउंडेशन चे आवाहन

पिंपरी, पुणे (दि. ०२ डिसेंबर २०२५) निगडी, आकुर्डी प्राधिकरण परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हरित सेतू प्रकल्पाअंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून वाढवलेले देशी वृक्ष तोडण्यात येतील. त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. सर्व रस्ते छोटे करून पदपथ मोठे केले जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक समस्या निर्माण होतील व अपघात होण्याची शक्यता आहे. हा हरीत सेतू प्रकल्प रद्द करावा, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी “निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरम फाउंडेशन” (एनपीआरएफ फाउंडेशन) या संस्थेच्या वतीने बुधवारी (दि.३ डिसेंबर), सायंकाळी पाच वाजता, हुतात्मा चौक, आनंद हॉस्पिटल जवळ, निगडी प्राधिकरण सेक्टर २६, २७ येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनात परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

निगडी, आकुर्डी प्राधिकरण परिसरात हरित सेतू प्रकल्प करू नये यासाठी संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे येथील पदपथ मोठे आणि वाहतुकीचे रस्ते लहान होत आहेत. त्यामुळे ठीक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पार्किंग सुविधा नाही. पुढील काळात रुंद झालेल्या पदपथावर टपरी, पथारी, फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. या परिसरात रेल्वे स्टेशन, मोठ्या शाळा, महाविद्यालये, राज्य व केंद्र सरकारची, मनपाची अनेक कार्यालये आहेत. या परिसरात दिवसभर शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व कामगारांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पिंपरी चिंचवड मधून रावेत, पुनावळे तसेच द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी येथे अहोरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अस्तित्वात असणारे रस्ते मुळातच कमी पडत आहेत. या परिसरात हरित सेतू प्रकल्प व्हावा अशी या परिसरातील कोणत्याही संस्था, संघटनांची व नागरिकांची मागणी नसताना देखील महानगरपालिकेचे हा प्रकल्प सुरू केला आहे. नागरिकांच्या गरजा, वाहतुकीची सध्याची परिस्थिती, परिसराची रचना याचा विचार केला नाही आणि खर्चिक, अनावश्यक प्रकल्प जबरदस्तीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गंभीर परिणाम होऊन अपघात होतील. या प्रकल्पाच्या विरोधात येथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत. तरी महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन प्रशासना विरोधात निषेध नोंदवावा असेही आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment