भोसरी एमआयडीसीत एलपीजी स्फोट : १ गंभीर, ५ जखमी; अग्निशमन विभागाचा तात्काळ प्रतिसाद
पिंपरी, ३० नोव्हेंबर २०२५ : भोसरी एमआयडीसी परिसरातील अंबिका पावडर कोटिंग कंपनीत एलपीजी (Liquefied Petroleum Gas) चा भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना शनिवारी (२९ नोव्हेंबर) दुपारी घडली. स्फोटाचा मोठा आवाज, आकाशात भडकलेल्या ज्वाला आणि परिसरात पसरलेल्या दाट धुरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.
या दुर्घटनेत एक कामगार गंभीर, तर पाच कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारी पावणे चारच्या सुमारास कंपनीतील एलपीजी सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे “व्हेपर क्लाऊड एक्सप्लोजन” झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, नेहरूनगर व भोसरी उपकेंद्रातील पथके अल्पावधीत घटनास्थळी दाखल झाली. उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, दिलीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ३० जवानांनी बचाव आणि अग्निशमन कार्य वेगात पूर्ण केले. कंपनीत मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलेंडर असल्याने धूर, उष्णता आणि संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेता जवानांना परिस्थिती हाताळणे मोठे आव्हान होते.
अग्निशमन दलाने घटनास्थळी उपस्थित सर्व कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले व परिसरातील स्फोटाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून महापालिका आणि संबंधित विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
जखमी कामगारांची नावे :
सुनील कुमार (गंभीर)
दाऊ कुमार
सुड्ड जयस्वाल
सुरज जाटो
राहुल कुमार
रोहित कुमार
प्रतिक्रिया :
“औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा मानकांचे पालन हा अपघात टाळण्याचा मुख्य मार्ग आहे. तपासणी, देखभाल आणि प्रशिक्षण याकडे दुर्लक्ष झाल्यास अशा दुर्घटना घडतात.”
— विजयकुमार खरोटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
— विजयकुमार खरोटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“एलपीजीसारख्या धोकादायक साधनांवर काम करताना नियमित देखभाल व प्रशिक्षण देणे कंपन्यांची मूलभूत जबाबदारी आहे. ही घटना जागरूकता वाढवणारी आहे.”
— व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
— व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“घटनेनंतर आमचे पथक काही क्षणातच घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रमाणात एलपी गॅसची गळती होऊन ‘व्हेपर क्लाऊड एक्सप्लोजन’ झाल्याचे दिसून आले. तरीही सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढणे हे आमचे सर्वोच्च ध्येय होते.”
— ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
— ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
