वाकड ते मामुर्डी रस्ता होणार ‘सुसाट’! आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आढावा बैठक

PCC NEWS
3 Min Read

वाकड ते मामुर्डी रस्ता होणार ‘सुसाट’!

आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आढावा बैठक

रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड अंडरपास आणि सेवा रस्त्यांच्या कामाला गतीहिंजवडी आयटी पार्क व मावळ ग्रामीण भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत

पिंपरी, दि. ८ नोव्हेंबर (pccnews.in)
चिंचवड मतदारसंघातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी मोठी पुढाकार घेतली आहे. मुंबई–बंगळुरू महामार्गालगत वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पिंपळे गुरव येथील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, कार्यकारी अभियंता सुभाष घंटे, समन्वयक विनोद पाटील तसेच हरिंद्र यादव उपस्थित होते.

आमदार जगताप यांनी सांगितले की, “वाकड, पुनावळे, ताथवडे परिसरात आयटी कंपन्या आणि मोठ्या सोसायट्यांमुळे नागरी वस्ती वाढली आहे. हिंजवडी आयटी पार्कला लागून असल्याने येथे वाहतूक कोंडी गंभीर होत आहे. त्यामुळे सेवा रस्ते, सबवे आणि अंडरपासचे काम प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे.”

यावेळी आमदारांनी मुळा नदी ते भुमकर चौक आणि भुमकर चौक ते मुळा नदी हा सर्कल मार्ग सर्वाधिक प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळी पाणी निचरा, सांडपाणी व्यवस्था, तसेच विविध सेवा वाहिन्यांसाठी डक्ट सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.

त्यांनी स्पष्ट केले की, महामार्गावरील सबवे आणि सेवा रस्ते हे राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या (मॉर्थ) कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे महापालिका थेट काम करू शकत नसली, तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

भुमकर चौक ते ताथवडे, ताथवडे ते पुनावळे अंडरपास येथील सेवा रस्त्यांचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणीही आमदारांनी केली. तसेच “बॉक्स पुशअप” प्रणालीद्वारे अंडरपास कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आमदार जगताप म्हणाले, “या रस्त्यांची गुणवत्ता अत्यंत उच्च दर्जाची राखावी. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून कामे करण्यात यावीत, जेणेकरून भविष्यात वारंवार दुरुस्तीची गरज भासणार नाही.

“राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत आज महत्त्वाची आढावा बैठक घेतली. वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर या भागातील सेवा रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. ही कामे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने कामे पूर्ण करून नागरिकांना सुसाट रस्ते द्यावेत.”

शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा

TAGGED:
Share This Article
Leave a comment