ॲड. सुप्रिया गायकवाड आम आदमी पार्टीच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षा नियुक्त
पिंपरी चिंचवड दिनांक १९ (प्रतिनिधी) आम आदमी पार्टीच्या पिंपरी विधानसभा क्षेत्रात नवीन नेतृत्वाला संधी देत, ॲड. सौ. सुप्रिया जालिंदर गायकवाड यांची पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रामाणिक आणि जनतेशी निगडित कार्यपद्धतीला बळकटी देण्यासाठी ही महत्त्वपूर्ण निवड करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रवीराज बाबन काळे यांनी सुप्रिया गायकवाड यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लढा दिला असून, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि जनतेशी असलेला थेट संवाद लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
शहराध्यक्ष काळे म्हणाले, “सुप्रिया गायकवाड यांच्या नेतृत्वामुळे पिंपरी विधानसभा क्षेत्रात आम आदमी पार्टीचे संघटन आणखी बळकट होईल. दिल्ली आणि पंजाबच्या जनकल्याणकारी मॉडेलप्रमाणे विकासाचा मार्ग पिंपरीतही निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
नवीन अध्यक्षा सुप्रिया गायकवाड म्हणाल्या, “पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत, आम आदमी पार्टीची तत्त्वे व जनहिताचे ध्येय घराघरात पोहोचवण्यासाठी मी अथक प्रयत्न करणार आहे.”
या कार्यक्रमाला शहराध्यक्ष रवीराज काळे, सुरेश गायकवाड, राहुल मदने, विकी पसोटे, सुरेश भिसे, इम्रान खान, शिवकुमार बनसोडे, संजीव झोपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.