पिंपरी चिंचवड : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उर्दू माध्यमिक विद्यालय रूपीनगर शाळेला प्रतिष्ठित ‘सर्वोत्तम शाळा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे.
हा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ग.दि. माडगूळकर सभागृह आकुर्डी प्राधिकरण येथे झालेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. मुख्याध्यापक श्री. आर.पी कोंढवळे सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा बहुमान शाळेला मिळाला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग, क्रीडा क्षेत्रातील यश आणि सामाजिक उपक्रमातील सक्रिय सहभाग या सर्व निकषांमध्ये शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुरस्कार स्वीकारताना मुख्याध्यापक श्री.आर.पी. कोंढवळे म्हणाले, “हा पुरस्कार संपूर्ण शाळेच्या कुटुंबाच्या एकत्रित मेहनतीचे फळ आहे. आम्ही भविष्यातही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहू.” या गौरवामुळे पिंपरी चिंचवड परिसरात शाळेचा नावलौकिक अधिक वाढला आहे आणि पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
