शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळांतील १६ विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरावर मानांकन.

PCC NEWS

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फ़त घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळांतील १६ विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरावर मानांकन.

पिंपरी, दि. ११ जुलै २०२४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फ़त घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांतील १६ विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर मानांकन मिळविले असून ही बाब अभिमानास्पद आहे, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फ़त घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. यामध्ये १३२ विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यापैकी १६ विद्यार्थी हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांतील आहेत. उर्दू शाळा आकुर्डी, उर्दू शाळा रुपीनगर, उर्दू शाळा थेरगाव, उर्दू शाळा खराळवाडी, उर्दू शाळा चिंचवड, उर्दू शाळा जाधववाडी, उर्दू शाळा लांडेवाडी, मुलांची शाळा मोशी, उर्दू शाळा दापोडी, उर्दू शाळा नेहरूनगर, मुलींची शाळा दिघी, अण्णासाहेब मगर माध्यमिक शाळा पिंपळे सौदागर या महापालिकेतील शाळांतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा स्तरावर गुणवत्ता यादीत आले आहेत.

गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वी तील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रमाणपत्रासह १० महिन्यांसाठी अनुक्रमे ५०० रुपये प्रती महिना आणि ७५० रुपये प्राप्त होणार आहे.

गेल्या दोन शैक्षणिक वर्षांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय क्रमवारी प्राप्त केलेल्या १९ सार्वजनिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या वतीने भारत दर्शन अभ्यास दौरा आयोजित केला होता. हे विद्यार्थी गेल्या वर्षी १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बंगलोर, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर या शहरांचा समावेश असलेल्या दक्षिण भारताच्या प्रवासाला गेले होते. त्यांच्यासोबत सात शिक्षक होते ज्यांनी त्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीत त्यांना मार्गदर्शन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) तसेच भारतीय विज्ञान संस्थेतील वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची तसेच प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांचे अन्वेषण करण्याची अनोखी संधी देखील विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

गतवर्षीप्रमाणेच या वर्षी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.

“या शिष्यवृत्ती परीक्षांमधील आमच्या विद्यार्थ्यांचे यश हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित करते. जास्तीत जास्त उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

– अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील.

“शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आमचे सततचे प्रयत्न या उत्कृष्ट निकालांवरून दिसून येतात. शिष्यवृत्ती निधी हे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात खूप मदत करेल.”

– सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात.

TAGGED:
Share This Article
Leave a comment