पुणे पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्याकडून चार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण.

PCC NEWS

पुणे पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्याकडून चार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण.

पुणे : जप्त केलेल्या चारचाकी व दुचाकी तसेच बिनधनी जमा असलेल्या वाहनांची विक्री केल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 आर राजा यांनी सोमवारी (दि.29) काढले आहेत. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस हवालदार दयानंद दशरथ गायकवाड, पोलीस नाईक संतोष शंकर आंदुरे, पोलीस शिपाई तुकाराम सदाशिव पांढरे, पोलीस शिपाई राजेश मनोज दराडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर करुन कायदेशीर कर्तव्यावर असताना बेकायदेशीर कर्तव्य व कृत्य केले. गुन्ह्यातील जप्त असलेली दुचाकी व चारचाकी वाहने तसेच बिनधनी जमा असलेली लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वाहनांची गैरलाभापोटी व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विक्री केली. या मोबदल्यात आरोपींकडून वेळोवेळी 4 लाख 60 हजार रुपये स्वीकारल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तसेच पोलीस कर्मचारी विना परवाना कर्तव्यावर गैरहजर राहिले.

पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन हे खात्याच्या शिस्तीस धरुन नसून अत्यंत गंभीर, बेजबाबदार, अशोभनीय व बेशिस्तपणाचे व गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे आदेशात नमूद करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत मुख्यालय सोडून जायचे असल्यास उपोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे शहर यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय येथे हजेरी देणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment